अमरावती : जिल्हा सामान्य रुग्णालयातील लॅबमध्ये टेक्निशियनच नसल्याने शनिवारी रक्त नुमने तपासणीसाठी आलेल्या रुग्णांना तसेच त्यांच्या नातेवाइकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. सकाळी ९ वाजल्यापासून रुग्ण हे तपासणीसाठी रांगेत उभे होते. परंतु दुपारी १२ वाजेपर्यंत एकही टेक्निशियन लॅबमध्ये पोहोचलेला नव्हता. त्यामुळे रुग्णालय प्रशासन संबंधितावर काय कारवाई करणार, असा प्रश्न आता रुग्ण उपस्थित करत आहेत.
जिल्हा सामान्य रुग्णालय येथे रोज शेकडो रुग्ण हे उपचारासाठी दाखल होत असतात. यातील काही रुग्णांच्या आजाराचे निदान करण्यासाठी डॉक्टरांकडून लघवी तसेच रक्त नुमन्यांची चाचणी करण्याचे सांगण्यात येते. या चाचण्या रुग्णालयातील ३७ नंबरच्या प्रयोग शाळेमध्ये केल्या जातात. याठिकाणी रोज शेकडो रुग्णांची चाचणी केली जाते. परंतु शनिवारी या प्रयोगशाळेमध्ये रक्त व लघवीचे नमुने तपासणी करणारा लॅब टेक्निशियनच नसल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांकडून संताप व्यक्त करण्यात आला. ही लॅब सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरू असणे अपेक्षित आहे. परंतु शनिवारी दुपारी १२ वाजेपर्यंत लॅबमधील टेक्निशियनच हजर नसल्याचे चित्र पाहायला मिळाले. यावर प्रशासनाकडून कारवाईची अपेक्षा रुग्णांनी केली आहे.
लॅबमध्ये टेक्निशियन नसल्याची माहिती मिळताच संबंधित टेक्निशियनची गैरहजेरी लावण्यात आली आहे. तसेच त्यांना वेतन कपात का करू नये, यासंदर्भात कारणे दाखवा नोटीसही बजाविण्यात आली आहे.-डॉ. प्रमोद निरवणे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक