अमरावती : महापालिकेतील कर्मचाऱ्यांच्या सहाव्या वेतन आयोगाच्या फरकाच्या थकीत ४० कोटी रुपयांची रक्कम अदा करण्याला मंजुरी द्यावी, याबाबतचा प्रशासकीय विषय आमसभेत कायम आहे. मात्र, तिजोरीत ठणठणाट असल्यामुळे ही रक्कम आताच देऊ नये, या मानसिकतेत लोकप्रतिनिधी आहेत. त्यामुळे या विषयावरुन लोकप्रतिनिधी विरुद्ध कर्मचारी असा वाद उफाळून येण्याची चिन्हे आहेत.गत आठ वर्षांपासून कर्मचाऱ्यांची प्रलंबित मागणी जानेवारी महिन्यात होऊ घातलेल्या सर्वसाधारण सभेत मंजूर करुन घेण्याची तयारी महापालिका कर्मचारी संघटनांनी चालविली आहे. कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी विविध पक्षांच्या सदस्यांकडे जाऊन सहाव्या वेतन आयोगाच्या फरकातील थकीत ४० कोटी रुपयांच्या मंजुरीविषयाला विरोध करु नका, अशी विनवणी करीत आहेत. मार्च महिन्यात अर्थसंकल्प सादर होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांनी थकीत ४० कोटी रुपयांची ही देणी अर्थसंकल्पात नमूद करण्यासाठी प्रयत्न सुरु केल्याचे दिसून येते. यापूर्वी हा ४० कोटी रुपयांचा विषय सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी आला होता. सर्वच लोकप्रतिनिधींनी जोरदार विरोध करुन हा विषय फेटाळला होता, हे विशेष. २००६ पासून सहाव्या वेतन आयोगाच्या फरकाची ४० कोटींची रक्कम थकीत आहे. कर्मचाऱ्यांची ही मागणी न्यायिक असली तरी महापालिकेची आर्थिक स्थिती लक्षात घेता ही रक्कम अदा करणे शक्य नसल्याची भावना अनेक नगरसेवकांची आहे. दुसरीकडे आमसभेत या विषयाला केवळ मंजुरी द्या, जेव्हा तिजोरीत पैसा येईल तेव्हा ही रक्कम कर्मचाऱ्यांना द्यावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांची आहे. काही लोकप्रतिनिधींचा या विषयाला कडवा विरोध आहे. त्यामुळे हा विषय मंजुरीसाठी आला की, सभागृहात घमासान झाल्याशिवाय राहणार नाही, कर्मचाऱ्यांना थकित ४० कोटी रुपये देण्यास सर्वच लोकप्रतिनिधी नाराज आहेत. मात्र, ही नाराजी जाहीरपणे कुणीही बोलून दाखवित नाही.
लोकप्रतिनिधीविरुध्द कर्मचारी वाद रंगणार!
By admin | Published: January 11, 2015 10:42 PM