अमरावती : बदली झाल्यानंतरही संबंधित विभागात ठाण मांडून बसलेल्या कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेच्या विभागप्रमुखांकडून कार्यमुक्त न केल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी चार दिवसात खुलासा सादर करण्याचे सुचविले असून, खुलासा असमाधानकारक असल्यास कारवाईचासुद्धा इशारा दिला आहे.
जिल्हा परिषदेतील विविध संवर्गातील कर्मचाऱ्यांची प्रशासकीय आणि विनंती बदली प्रक्रियाही जुलै २०२१ मध्ये राबविण्यात आली. यात बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना १७ ऑगस्टपर्यंत कार्यमुक्त होऊन स्थानांतरणाच्या ठिकाणी रुजू होण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले होते. या आदेशाला केराची टोपली दाखवत काही विभागप्रमुखांकडून कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त केले नाही. त्यामुळे सर्वसाधारण कर्मचारी आदिवासी भागात रूजू झाल्याशिवाय आदिवासी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करता येत नाही. परिणामी या कर्मचाऱ्यांची मोठी अडचण निर्माण होत असल्याची बाब जिल्हा परिषद कर्मचारी युनियनने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली होती. याची दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी विभागप्रमुखांना कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे. याबाबत बुधवारपर्यंत खुलासा मागविण्यात आला होता. खुलासा असमाधानकारक असल्यास कारवाईचा इशारा सीईओ अविश्यांत पंडा यांनी नोटिशीत दिला आहे.