फोटो - बस ०९ पी
बडनेरा : शहराला दोन दिवसांच्या अतिवृष्टीने चांगलाच मनस्ताप झेलावा लागतो आहे. संरक्षण भिंतीलगतच्या केरकचऱ्यामुळे पाणी निघून जाण्याचे मार्गच बंद झाल्याने येथील एसटी बस स्थानकाच्या आवारात नाल्यासमान घाण पाणी साचले होते. रेल्वे स्थानक परिसरातही पाणी होते. शहरातील बऱ्याच भागातील झोपड्यांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने रहिवाशांना समस्यांचा सामना करावा लागत आहे.
बडनेराच्या नवी वस्तीतील एसटी बस स्थानकाच्या आवारात पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचले. प्रवाशांसह कर्मचाऱ्यांना याचा मोठा मनस्ताप झेलावा लागत आहे. बसस्थानकाच्या संरक्षण भिंतीला लागूनच केरकचरा मोठ्या प्रमाणात टाकला जातो. त्यामुळे पाणी निघून जाण्याचे मार्ग बंद पडल्याने बसस्थानकाच्या आवारात नाल्यासारखी घाण साचली आहे. सध्या डेंग्यू व इतर आजारांच्या साथीने लोक प्रचंड त्रस्त आहेत. पाणी साचल्यामुळे प्रवासीदेखील धास्तावले आहेत. आगार व्यवस्थापकांनी मनपा आयुक्त प्रशांत रोडे यांच्याकडे लेखी स्वरूपात सदरची समस्या मांडल्याचे सांगण्यात येते.
दोन दिवसाच्या अतिवृष्टीमुळे रेल्वे स्थानकासमोरील पार्किंग, तिकीट बूकिंग ऑफिस, रेल्वे पोलीस ठाणे, सेक्शन इंजिनीअरिंग कार्यालय परिसरातदेखील पाणी साचले. शहरातील बऱ्याच झोपड्यांमध्ये पाणी शिरले. यामुळे यातील रहिवाशांना उघड्यावरच रात्र काढण्याची वेळ आली आहे. प्रशासनासह सामाजिक संघटना, नेते मदतीला धावले आहेत.