अमरावती : कुठे गेली होतीस ? मागेदेखील तू एका मुलाशी बोलताना दिसलीस, असे म्हणून तो व्हिडीओ वडिलांना पाठविण्याची धमकी देत एका अल्पवयीन मुलीचा पाठलाग करण्यात आला. १८ एप्रिल रोजी दुपारी चारच्या सुमारास खोलापुरी गेट पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. याप्रकरणी, पोलिसांनी १८ रोजी आरोपी शुभम खंडेलवाल (२८, अमरावती) याच्याविरुद्ध विनयभंग व पोक्सो अन्वये गुन्हा दाखल केला.
तक्रारीनुसार, फिर्यादी मुलगी ही आठवीत असताना तिने ट्युशन क्लास लावले होते. तेथे आरोपी शुभम खंडेलवाल हा असिस्टंट होता. त्यामुळे शुभमशी तिचे क्लासच्या निमित्ताने बोलणे व्हायचे. नववीत गेल्यानंतरदेखील ती सायकलने शिकवणीला जायची. अलीकडे महिनाभरापासून शुभमने तिचा ट्युशन ते घर असा पाठलाग सुरू केला. त्याने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिने त्याच्याशी बोलणे टाळले. दरम्यान, १५ एप्रिल रोजी ती ट्युशनला जात असताना आरोपीने तिला मोठ्याने आवाज दिला. मात्र, ती थांबली नाही. त्यावेळी तिला घाबरविण्याच्या उद्देशाने ट्युशनमध्ये ॲडमिशन घेण्याच्या बहाण्याने तो ट्युशनचालकाशीदेखील बोलला. ती बाब तिने कुटुंबीयांना सांगितली.
अशी घडली घटना
अल्पवयीन मुलगी १८ एप्रिल रोजी दुपारी चारच्या सुमारास घरून ट्युशनला जात असताना शुभम खंडेलवालने तिचा पाठलाग सुरू केला. तिची सायकल मागून पकडून तिला जबरदस्तीने थांबविले. तिची छेड काढत ‘तू आज मैत्रिणीकडे कशाला गेली होती ? तुझ्या पप्पाला| सांगू का ? मागेही तू मुलासोबत बोलत होतीस, तो व्हिडीओसुद्धा तुझ्या बाबाला सेंड करतो, अशा धमक्या तिला दिल्या. त्यामुळे ती नखशिखांत हादरली. लगबगीने घरजवळ करीत तिने आईकडे आपबिती कथन केली तथा सायंकाळच्या सुमारास खोलापुरी गेट पोलिस ठाणे गाठले.