अंजनगाव सुर्जी : कामाचा ताण, अपुऱ्या सोयी यामुळे तणावाचा सामना करणाऱ्या तलाठ्यांनी विविध मागण्यांसाठी २६ एप्रिलपासून बेमुदत संप पुकारण्याचा पवित्रा घेतला आहे. वर्षभरापासून शासनाने संगणकीकृत सातबारा व ई-फेरफारचा गाजावाजा करून अंजनगाव-दर्यापूर तालुक्यात या प्रक्रियेची सुरूवात केली. यातून शेतकऱ्यांना सुविधा देण्याचाच हेतू होता. परंतु सातबारा दुरूस्तीमुळे तलाठ्यांवरील कामाचा ताण वाढला आहे. वारंवार दुरूस्ती करूनही सातबारा व फेरफार 'अपडेट' होत नाही. शासनाने या उपक्रमाकरिता तलाठी मंडळ अधिकारी स्तरावर कोणत्याही पायाभूत सोयी पुरविल्या नाहीत. त्यांचे लॅपटॉप, प्रिंटर व नेट कनेक्टीव्हिटीची रक्कम मिळत नाही. त्यामुळे अनेक संकटातून तलाठ्यांना जावे लागते. यातून त्यांची प्रतिमा देखील शेतकरी व प्रशासनासमोर मलिन होते. या सर्व बाबींचा विचार करून महाराष्ट्र राज्य तलाठी-पटवारी मंडळ अधिकारी समन्वय संघाने शासनाच्या विरोधात आंदोलन पुकारण्यात आले आहे. या आंदोलनात दर्यापूर व अंजनगाव तालुक्यातील सर्व पटवारी व मंडळ अधिकारी सहभागी होेणार आहेत. आंदोलनाच्या श्रुंखलेत ११ एप्रिलला तलाठ्यांनी काळ्या फिती लाऊन काम केले. १६ एप्रिल रोजी तहसील कार्यालयासमोर निदर्शने केले जातील. २० रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे, तर २६ एप्रिल पासून बेमुदत संप पुकारण्याचा इशारा दर्यापूर व अंजनगाव येथील उपविभागीय अधिकाऱ्यांना सादर निवेदनातून देण्यात आला आहे. (शहर प्रतिनिधी)शेतकरी भरडला जातोआॅनलाईन सातबाऱ्याचे संगणकीकृत कामकाज शेतकरी व तलाठ्यांसाठी खूप डोकेदुखी ठरत आहे. शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपाच्या वेळी जर तलाठी संपावर गेले तर यामध्ये शेतकऱ्यांचे मरण होणार आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकरणात शेतकरीच भरडला जाईल, अशा प्रतिक्रिया आहेत. आमच्या अडचणी शासन व प्रशासन यांना वेळोवेळी सांगितल्या. त्या मनावर घेतल्या असत्या तर आज ही वेळ आली नसती. आम्ही संगणकीकृत कामकाजावर बहिष्कार टाकला तर शेतकऱ्यांना खूप हालअपेष्टा सहन कराव्या लागतील. - मनोज राऊत, सचिव, तलाठी संघटना.
तलाठी २६ पासून बेमुदत संपावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2016 12:07 AM