अनिल कडू
परतवाडा (अमरावती) : मेळघाट प्रादेशिक वनविभागासह परतवाडा वनपरिक्षेत्र अंतर्गत अवैध सागवान तस्करीच्या अनुषंगाने विधानसभेत तारांकित प्रश्न टाकण्यात आला आहे. या प्रश्नाचे उत्तर शासनदरबारी देण्याकरिता सध्या वनअधिकाऱ्यांची लगबग सुरू आहे.
अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके व इतर विधानसभा सदस्यांनी हा तारांकित प्रश्न क्रमांक ५१२७५ उपस्थित केला आहे. शासनस्तरावरून कक्ष अधिकाऱ्याने १ डिसेंबरच्या पत्रान्वये या तारांकित प्रश्नाचे उत्तर वनअधिकाऱ्यांकडून मागविले आहे. या तारांकित प्रश्नामध्ये परतवाडा, बहिरम, अमरावती प्रादेशिक वनविभागाचे आणि मेळघाट प्रादेशिक वनविभागासह मध्यप्रदेश-महाराष्ट्र आंतरराज्य सागवान लाकूड तस्करीबाबतही विचारणा करण्यात आली आहे.
लाखो रुपयांच्या अवैध सागवानासह चारचाकी वाहन (एम.एच. २९, एन. ९६३२) बहिरममध्ये ६ सप्टेंबरला आढळून आले. यातील १.५१२ घनमीटर अवैध सागवान लाकडाचे २३ नग वाहनासकट जप्त केले गेले. पण, यातील आरोपी आजही बेपत्ता आहेत.
मेळघाट प्रादेशिक वनविभागांतर्गत अवैध सागवान वृक्षतोड व लाकूड तस्करीच्या अनुषंगाने खुद्द अंजनगाव पोलिसांनी कारवाई करून प्रकरण वनाधिकाऱ्यांच्या सुपुर्द केले. पण, अजूनही होणारी लाकूड तस्करी व अवैध सागवान वृक्षतोड वनविभागाला थांबविता आलेली नाही.
वनगुन्हा नाही, संशयितांची चौकशी नाही; आंतरराज्य सागवान तस्करीत ‘सब गोलमाल है’
मध्य प्रदेश-महाराष्ट्र आंतरराज्य सागवान लाकूड तस्करीतील वाहन परतवाडालगत असलेल्या वडुरा शेतशिवारात २० नोव्हेंबरला पकडले गेले. यातील वाहनासह १.२३४ घनमीटर सागवान लाकडाचे ७२ नग स्थानिक वनाधिकाऱ्यांनी मध्यप्रदेश वनविभागाच्या स्वाधीन केले. पण, आरोपी अद्यापही मोकाट आहेत.
नियमित गस्त आणि बीट तपासणी?
वनविभागासह वन्यजीव विभागात सध्या कर्मचाऱ्यांची वानवा आहे. वनरक्षकासह वनपालांची पदे रिक्त आहेत. असे असतानाही अवैध वृक्षतोडीसह सागवान लाकूड तस्करी नाही. नियमित गस्त आणि बीट तपासणी केली जात असल्याचे सांगितले जात आहे.
आरोपी बेपत्ता
बहुतांश प्रकरणात अज्ञात व्यक्तीविरुद्ध वनगुन्हा जारी केला जातो. पण, अशा प्रकरणात अखेरपर्यंत आरोपी बेपत्ता राहतो.