चांदूर बाजार : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत चांदूर बाजार शहरासह ग्रामीण भागातील रुग्णसंख्येत मोठी वाढ होत आहे. चांदूर बाजार तालुक्यातील कारोनाची लागण झालेल्या रुग्णांना उपचारासाठी अमरावती धाव घेण्याशिवाय कोणताही पर्याय नाही. सध्या अमरावती शहरात रुग्णांवर उपचारासाठी बेडची मोठी अडचण निर्माण झाली आहे. गोरगरीब रुग्णांना त्वरित उपचार मिळावा, याकरिता कोणतेही शासकीय कोविड रुग्णालय चांदूर बाजार तालुक्यात नसल्याने रुग्णाची चिंता वाढलेली आहे. नागरिकांच्या या गैरसोयीची दखल नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी घेऊन त्वरित चांदूर बाजारच्या उपजिल्हा रुग्णालय इमारतीमध्ये कोविड रुग्णालय सुरू करण्यात यावे तसेच आवश्यक मनुष्यबळ व औषध पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
चांदूर बाजार तालुक्यात सध्या कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशातच शासकीय कोविड रुग्णालयात व्यवस्था नसल्याने कोविडची लक्षणे असलेल्या रुग्णांना अमरावतीला जाण्याशिवाय कोणताही पर्याय नाही. अमरावती शहरात सुद्धा आजूबाजूच्या जिल्ह्यातील रुग्ण उपचारार्थ येत असल्याने अमरावती शहरातील आरोग्य यंत्रणेवर मोठ्या प्रमाणात ताण वाढलेला आहे. रुग्णांना वेळेत बेड मिळणे कठीण झालेले आहे. अनेकदा रुग्णांना वेळेत रुग्णवाहिका मिळणे शक्य होत नाही.
काही रुग्णांना त्वरित ऑक्सिजन व उपचाराची गरज भासत असल्याने तालुका कोविड रुग्णालयातून त्यांना अमरावती येथे जाण्यास विलंब होतो. तसेच बेडची कमतरता असल्याने बेडची उपलब्धता निश्चित होऊन रुग्ण उपचारार्थ भरती होईस्तोवर बराच विलंब होऊन रुग्ण दगावल्याचे प्रमाण वाढत आहे. त्याकरिता तालुक्यातील करोना रुग्णांना वेळेत ऑक्सिजन व औषधोपचार मिळण्याकरिता कोविड रुग्णालय असणे फार गरजेचे झालेले आहे.
चांदूर बाजार येथे उपजिल्हा रुग्णालयाची नवीनच इमारत तयार झालेली असून तेथे कोविड केअर सेंटर सुरू आहे. त्याच इमारतीत कोविड रुग्णालय सुरू करणे फार सोईचे होईल. आवश्यक मनुष्यबळ व औषध पुरवठ्यासह चांदूर बाजार येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीत कोविड रुग्णालय त्वरित सुरू करण्याची मागणी नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय यांच्यामार्फत जिल्हा शल्यचिकित्सक अमरावती यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.