कोरोनाची धास्ती कायम, पालकांकडून ‘नो रिस्क’, शाळांमध्ये लसीनंतर गर्दी वाढण्याचे संकेत
अमरावती : शासन निर्णयानुसार नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा २३ नोव्हेंबरपासून सुरू झाल्या आहे. मात्र, सोमवारी ९ दिवसानंतरही शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत वाढ झालेली नाही. कोरोना नियमावलींचे पालन करीत शिक्षकांची अध्यापनाची तयारी आहे. तथापि, पालकांकडून ‘नो रिस्क’ म्हणत ऑफलाईन अभ्यासक्रमाला नकारघंटा कायम आहे.
जिल्ह्यात नववी ते बारावी या वर्गाची ५४८ शाळा व कनिष्ठ महाविद्यालये सुरू झाल्याची नोंद शिक्षण विभागाकडे आहे. शाळांमध्ये इंग्रजी, गणित व विज्ञान विषयांच्या ऑफलाईन अध्यापनाला प्राधान्य दिले जात आहे. दिवसाआड वर्ग शिकवणी होत असल्यामुळे शाळांमध्ये कोरोना नियमावलींचे उल्लंघन होणार नाही, याची दक्षता घेण्यात येत आहे. शहरी व ग्रामीण भागात शाळांमध्ये शिक्षकांची उपस्थिती असली तरी विद्यार्थ्यांचा अध्यापनाला प्रतिसाद नाही, हे वास्तव आहे. शाळेच्या प्रवेशद्धारावरच सॅनिटायझर, स्क्रिनिंग तपासणी, हॅन्डवॉश अशा वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध आहेत. वर्गात फिजिकल डिस्टन्स पाळत जात आहे. मात्र, पालकांच्या मनात कोराेनाची धास्ती कायम असल्याने तूर्त मुलांना शाळा नको, अशी भावना आहे. नववी ते बारावीपर्यंतच्या एकूण ५४८ शाळांमध्ये १ लाख ५५ हजार विद्यार्थी असून, विद्यार्थ्यांची उपस्थिती १० टक्क्यांपेक्षा अधिक नाही, हे चित्र आहे.
------------------------
कोरोना नियमावलींचे पालन करुन शाळा सुरू करण्यात आली. मात्र. अद्याप पालकांचा ऑफलाईन अभ्यासक्रमाला फारसा प्रतिसाद नाही. पालकांकडून संमतीपत्राला नकार असून, कोरोनाची धास्ती कायम आहे.
- के.बी. इंगळे, मुख्याध्यापक, जिल्हा परिषद मुलींची शाळा.
--------------------
शाळांमध्ये वर्ग शिकवणीतून लवकर अभ्यासक्रम लक्षात येतो. घरी शाळेचे वातावरण मिळत नाही, हे खरे आहे. ऑफलाईन अभ्यासक्रमातून चांगल्या पदध्तीने ज्ञानार्जन होत आहे. शिक्षकांचे उत्तम मार्गदर्शन मिळत आहे.
- कोमल थोरात, विद्यार्थिनी.