ग्रामस्थांची मागणी, महावितरणच्या कार्यालयावर धडक
मोर्शी : तालुक्यातील पाळा येथील बंद असलेली सिंगल फेज लाईन त्वरित सुरू करण्यात यावी, या मुख्य मागणीसाठी पाळा येथील शेतकरी ग्रामस्थ महावितरण कार्यालयावर धडकले. प्रहार युवा संघटनेचे नरेंद्र सोनागोते यांच्या नेतृत्वात कार्यकारी अभियंत्यांकरिता निवेदन देण्यात आले.
दीड ते दोन महिन्यापासून मौजा पाळा येथील सिंगल फेज लाईन बंद असल्याने पावसाळ्याच्या दिवसात रात्री-अपरात्री शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांना अंधारात विंचू, साप व इतरही सरपटणाऱ्या प्राण्यांमुळे जीवितास धोका निर्माण झाला आहे. शेतात वास्तव्यास असणाऱ्या रखवालदारांनाही अंधारात राहावे लागते. या गंभीर समस्येची दखल घेऊन मौजा पाळा येथील सिंगल फेज लाईन त्वरित सुरू करण्यात यावी, अन्यथा प्रहार युवा संघटनेच्या वतीने प्रहार स्टाईलने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा प्रहार संघटनेचे अनिल खांडेकर, मंगेश इंगोले, नरेंद्र सोनागोते, राजू बीसाद्रे, कमलेश अमृते, राजेंद्र गुडदे, नितीन ढोमणे, शकील शहा, निलेश लायदे, किशोर वानखडे, केशव गोडगाम, निखिल फलके, विजय चुनावडे, आशिष गेडाम, प्रज्वल बनसोड, अविनाश निंभोरकर, रंजित गेडाम आदींनी दिला आहे.