पान १
फोटो तसरेंकडे
अमरावती : राजापेठ पोलीस ठाण्यातील अतिसुरक्षित लॉकअपमध्ये झालेल्या सागर ठाकरे (२४) या आरोपीच्या पहाटेच्या आत्महत्येवर त्याच्या कुटुंबीयांनी रोष व्यक्त केला असून, संबंधितांना तातडीने निलंबित करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, यासंबंधी राजापेठ ठाण्यातील पोलीस गार्ड प्रशांत इंगोले यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले असून, राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने प्रकरणाशी संबंधित सर्वांची चौकशी चालविली आहे. घटनेनंतर लगेचच राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने मोर्चा सांभाळून स्थानिक पोलीस प्रशासनाचे ‘हार्टबिट’ वाढविले.
गुरूवारी सकाळी ७ वाजता ही घटना उघड झाल्यानंतर दुपारी ४.३० पर्यंत राजापेठ ठाण्याला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. दुपारी ४.३० च्या सुमारास सागरचा मृतदेह अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.
अतिसुरक्षित पोलीस कोठडीत आरोपीने गळफास कसा घेतला, यावर शंका निर्माण केल्या जात आहे.
सागर ठाकरे याला पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याने त्याला फ्रेजरपुरा ठाण्यातील उपनिरीक्षक भारती मामनकर यांनी बुधवारी सायंकाळी राजापेठ पोलीस ठाण्यात आणले. त्याने तेथेच गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलीस लॉकअपमध्ये सीसीटीव्हीसह पोलीस गार्ड तैनात असताना घडलेल्या आत्महत्येने पोलीस ठाण्यातील ‘निग्लेजंसी ऑफ वर्क’ चव्हाट्यावर आले आहे.
बहिणीचा आक्रोश
आत्महत्येची माहिती त्याच्या कुटुंबीयांना देण्यात आली. दुपारी १२ च्या सुमारास त्याची बहीण, जावई व भाऊ राजापेठ ठाण्यात पोहचले. बहिणीचा आक्रोश हृदय पिळवटणारा होता. संबंधित पोलिसांवर कारवाई होईपर्यंत मृतदेह हलवू देणार नाही, असा पवित्रा कुटुंबीयांनी घेतला. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
त्याने मृतदेहासोबत काढले ८ तास
राजापेठच्या लॉकअपमध्ये सागर ठाकरे व्यतिरिक्त बडनेरा पोलीस ठाण्यातील एक आरोपी होता. तो दुसरा आरोपी दुपारी ३ पर्यंत त्याच लॉकअपमध्ये सागरच्या मृतदेहाजवळ होता. डीसीपींच्या आदेशानुसार, दुपारी काही काळासाठी त्याला लॉकअपबाहेर काढण्यात आले, तेव्हा तो भयभीत झाला होता.
जावयाने नोंदविली तक्रार
सागर ठाकरे आत्महत्याप्रकरणाचा तपास निष्पक्षपणे करावा, सागरच्या कुटुंबातील एकाला पोलीस सेवेत घ्यावे, शवविच्छेदन ‘ऑन कॅमेरा’ व्हावे, जे पोलीस अधिकारी दोषी असतील, त्यांना निलंबित करण्यात यावे, अशी तक्रार सागर ठाकरेचे जावई मनोज निकाळजे (नागपूर) यांनी पोलीस आयुक्तांकडे केली.