अमरावती: अवैध दारू वाहतुकीच्या गुन्ह्यात जप्त असलेली मोटारसायकल सुपूर्दनाम्यावर परत देण्याकरिता पाच हजारांची लाच घेताना राज्य उत्पादन शुल्क विभाग, मोर्शी येथील जवानाला एसीबीने रंगेहात पकडले. दिनकर तुकाराम तिडके (वय ४८ वर्षे) असे त्या लाचखोर जवानाचे नाव आहे. २२ एप्रिल रोजी दुपारी मोर्शी येथील राज्य उत्पादन शुल्क विभाग कार्यालयातच ही कारवाई करण्यात आली.
तिडके हे १० हजार रुपये लाचेची मागणी करीत असल्याची तक्रार एसीबीला प्राप्त झाली होती. त्या तक्रारीची ८ एप्रिल रोजी पडताळणी करण्यात आली. त्यावेळी जप्त मोटारसायकल सुपूर्दनाम्यावर परत देण्याकरिता तिडके याने तडजोडीअंती ५ हजार रुपये लाचेची मागणी करून ती रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले. त्यानंतर एसीबीकडून ट्रॅप रचण्यात आला. मात्र तिडके हा राज्य उत्पादन शुल्क विभाग मोर्शी कार्यालयात उपस्थित नसल्याने तो त्यावेळी यशस्वी होऊ शकला नाही. दरम्यान २२ एप्रिल रोजी तिडके याने ५ हजार रुपये लाच स्वीकारल्याने त्याला रंगेहात पकडण्यात आले आहे. त्याच्याविरुद्ध मोर्शी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. एसीबीचे अधीक्षक मारुती जगताप, अपर पोलिस अधीक्षक अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक मिलिंदकुमार बहाकर व मंगेश मोहोड, हवालदार प्रमोद रायपुरे, नितेश राठोड, युवराज राठोड, चंद्रकांत जनबंधू यांनी केली.