गणेश वासनिक
अमरावती : वन व वन्यजीवांचा होणारा ऱ्हास आणि यात समृद्ध करण्याचा ध्यास हे तत्त्व अंगीकारून वनविभागाने वनकर्मचाऱ्यांकरिता दत्तक वन ही संकल्पना सोडली आहे. यामाध्यमातून वनकर्मचारी आता संपूर्ण बीटचे पालकत्व स्वीकारून त्या वनांना मुलांसारखे सांभाळणार आहेत.
राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक नागपूर यांनी ‘टाॅप टू बाॅटम’ नुसार सर्व प्रकारचे वने वनकर्मचारी व वनाधिकाऱ्यांनी दत्तक घेऊन त्यांचा सांभाळ करावा, त्यास मोठे करावे, आणि त्यातून समृद्ध जंगल निर्माण करावे, याकरिता वन विभागाने ही संकल्पना सोडलेली आहे. ज्यामुळे वनांचे व वन्यजीवांचे योग्यरीत्या संरक्षण करून नियोजन आखणे त्यास आवश्यक त्या उपयोजना आखून समृद्ध करण्याचा हा मार्ग आहे. त्यासाठी राज्यातील सर्व वनकर्मचाऱ्यांना आता त्यांचे अधिनस्त संरक्षित राखीव किंवा खुंटलेले जंगल दत्तक द्यावे लागणार आहे.
कशी असेल ही संकल्पना
दत्तक गाव या संकल्पनेवर आधारित ही संकल्पना असली तरी, वनविभागात वनकर्मचारी गाव नव्हे, तर वनक्षेत्र, रोपवन, वन्यजीवांचे अधिवास, पक्षी अधिवास कादंळवने असे वनातील स्थळे दत्तक घेणार आहेत. पालक म्हणून त्यांना त्या क्षेत्राचा संपूर्ण आराखडा तयार करावा लागेल. त्यात कार्य उपायोजना आखता येईल, याची माहिती तयार करावी लागेल व त्यानुसार विकास सादर केला जाईल.
बदलीनंतर कार्यभार हस्तांतरण होणार
दत्तक वन या योजनेतील वनकर्मचाऱ्यांची बदली झाल्यानंतर नवीन वनकर्मचाऱ्यांस हे दत्तक वन चार्ज मध्य हस्तांतरित करावे लागेल, त्यामध्ये दत्तक घेतलेले वनक्षेत्र, बीट कक्ष क्रमांक याशिवाय इतर माहिती द्यावी लागेल, अशी नवी संकल्पना असणार आहे. दत्तक वनांमध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या वन कर्मचाऱ्यांना शासनामार्फत गौरविले जाणार आहे.