अमरावती : दिल्ली सरकारने १९ एप्रिल रोजी पत्रक काढून ऑनलाईन अध्यापनास विराम दिला. २० एप्रिल ते ९ जूनपर्यंत शाळांना उन्हाळी सुट्टी जाहीर केली आहे. त्याच धर्तीवर आपणही हे शालेय वर्षे समाप्त झाल्याचे घोषित करून ऑनलाईन अध्यापन बंद करण्याबाबतचे व सुटीचे आदेश संबंधिताना द्यावेत आणि विद्यार्थी व शिक्षक यांना २ मे पासून उन्हाळी सुट्टी जाहीर करावी. जेणेकरून मुले व शिक्षक यांनाही त्यांची हक्काची सुटी उपभोगता येईल, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
दरवर्षी शालेय वर्षातील अध्यापन समाप्ती मार्च अखेर होऊन एप्रिलमध्ये परीक्षा घेण्यात येत असतात . आणि विद्यार्थी शिक्षक यांना अध्ययन अध्यापनातून सुटी मिळते. उन्हाळी गणपती, दिवाळी, नाताळच्या सुटीतही ऑनलाईन वर्ग सुरू आहेत. भ्रमणध्वनी किंवा संगणकावर अध्ययन, अध्यापन केल्याने मानेचे त्रासही उद्भवू लागले आहेत.
तसेच मुलांनाही मोबाईलवरील सततच्या अध्ययनामुळे त्रास होत असल्याबाबत पालकांची तक्रार आहेच तसेच मुलेही वर्षभरापासून मुंबईसह इतर जिल्ह्यात छोट्या घरात कोंडून असल्यामुळे पालकांनाही त्यांच्या मूळगावी जाण्याचे नियोजन करायचे आहे. म्हणुन राज्य शासनाने २ मे पासून शाळांना सुटी घोषित करावी, असेही शिक्षक समितीने म्हटले आहे.