अमरावती - राज्यातील लाच लुचपत प्रतिबंधक विभागांतर्गत येणाऱ्या आठही परिक्षेत्रात एसीबीने तीन महिन्यांत तब्बल १६२ सापळे यशस्वी केले. २२४ आरोपी ट्रॅपमध्ये अडकले आहेत. ही कारवाई १ जानेवारी ते ३ मार्च २०१९ पर्यंतची केल्याची नोंद एसीबीकडे झाली आहे. लाच स्वीकारण्यात नेहमीप्रमाणे महसूल विभाग अव्वल असून ४२ सापळ्यांमध्ये महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी अडकले आहेत. दुसऱ्या स्थानी २८ सापळ्यांमध्ये पोलीस विभाग अडकला आहे.
वीज वितरण कंपनी ५ सापळे, महापालिका १२, नगरपरिषद ६, जिल्हा परिषद ७, पंचायत समिती १५, वनविभाग ५ असे यामध्ये अनेक विभागांत १६२ सापळे एसीबीच्या पथकाने यशस्वी केलेत. दोन महिन्यांत अपसंपदा पाच, तर अन्य भ्रष्टाचाराचे एक प्रकरण दाखल झाले आहे. शासनाच्या विविध शासकीय विभागांत केलेले ट्रॅप, अपसंपदा व अन्यभ्रष्टाचाराचे असे एकूण १६८ प्रकरणे एसीबीकडे दाखल आहेत. सन २०१८ या वर्षांत राज्यभरातील विविध विभागांत ८९१ सापळे, २२ अपसंपदा प्रकरण, २३ अन्य भ्रष्टाचाराचे प्रकरण दाखल झाले होेते. दोन महिन्यांत यशस्वी झालेल्या सापळा रक्कम ही ६४ लाख ७७ हजार ६४० एवढी होती.
ट्रॅपमध्ये पुणे विभाग अव्वल
दोन महिन्यांत केलेल्या एसीबी कारवाईमध्ये पुणे विभाग अव्वलस्थानी असून २६ सापळे यशस्वी झालेत. मुंबई १२ सापळे, ठाणे २५, नाशिक १५, नागपूर २२, अमरावती २४, औरंगाबाद २०, नांदेड १८ असे एकूण १६२ सापळे यशस्वी झालेत. यामध्ये २२४ आरोपींताचा समावेश आहे. एसीबी कारवाया वाढल्याने लाच स्वीकारणाºया अधिकारी, कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.