अमरावती : जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत जिल्हाभरात एकूण १६४ अपघात झाले असून, त्यात सर्वाधिक ९३ अपघात हे राज्य महामार्गावर झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील स्टेट हायवे अधिक डेंजरस बनल्याचे वास्तव उघड झाले आहे. पाठोपाठ ३८ अपघात हे अन्य मार्गांवर तर ३३ अपघात हे राष्ट्रीय महामार्गावर घडले आहेत.
तीन महिन्यांतील १६४ अपघातांत एकूण ९२ जणांचा मृत्यू झाला. त्यातील ५३ जण हे राज्य महामार्गावर झालेल्या अपघातांचे बळी ठरले आहेत. तर राष्ट्रीय महामार्गानेदेखील २२ मानवबळी घेतले आहेत. जिल्ह्यातील अपघातांची संख्या कमी करण्यासाठी पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा वाहतूक शाखेचे प्रमुख गोपाल उंबरकर यांनी गेल्या दोन वर्षांपासून अपघातांच्या सूक्ष्म अवलोकनासह जनजागृतीही हाती घेतली आहे. ‘यम है हम’ व ‘हेडलेस मॅन’च्या माध्यमातून प्रभावी जनजागरण करण्यात आले. मात्र, वाहनचालकांना वेगाचा मोह आवरत नसल्याने अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. सन २०२२ च्या पहिल्या तीन महिन्यांत १५४ अपघात झाले होते. त्यात एकूण ९७ जण मृत्युमुखी पडले होते. यंदाच्या पहिल्या तीन महिन्यांत अपघाताच्या संख्येत १० ची वाढ झाली.
राज्य, राष्ट्रीय महामार्गावर वाहनांचा वेग १२० वर
राज्य व राष्ट्रीय महामार्गावर वाहने अतिशय बेदरकारपणे चालविली जातात. या मार्गांवर वाहतूक पोलिस वा महामार्ग पोलिस मर्यादित ठिकाणी राहत असल्याने अशा वाहनधारकांच्या वेगावर कुणाचाही धरबंद राहत नाही. सर्वाधिक अपघातदेखील याच मार्गांवर होतात. राज्य, राष्ट्रीय महामार्गावर वाहनांचा वेग १२० च्या पुढे जातो.
डेंजरस ड्रायव्हिंगचे २० बळी
वेग नियंत्रित ठेवल्यामुळे वाहतूक सुरळीत राहते. अपघाताची आकडेवारी पाहिल्यास त्यातील सर्वाधिक बळी हे बेदरकार वाहतुकीचे आहेत. मार्चमध्ये २६ जणांचा अपघाती मृत्यू झाला. यात सर्वाधिक २० जण हे डेंजरस ड्रायव्हिंगचे बळी ठरले.
- गोपाल उंबरकर, वाहतूक पोलिस निरीक्षक.
वाहतूक शाखेचे सूक्ष्म अवलोकन
ओव्हरस्पीडिंग, डेंजरस ड्रायव्हिंग, दारू पिऊन वाहन चालविणे, राँग साईड वाहने चालविणे, हेल्मेटविना वाहने, सिग्नल तोडणे, विनासिटबेल्ट, वाहने चालवताना मोबाइलवर बोलणे व लेन कटिंग ही अपघाताची प्रमुख कारणे आहेत. जिल्ह्यातील अपघात नेमक्या कोणत्या कारणाने झाले, त्याचा सूक्ष्म अभ्यास वाहतूक शाखेने चालविला आहे. त्यात डेंजरस ड्रायव्हिंग हे मानवबळीचे सर्वांत मोठे कारण ठरले आहे. गेल्या महिनाभरात झालेल्या ४९ अपघातांत ३४ अपघात हे डेंजरस ड्रायव्हिंग तर, १२ अपघात ओव्हर स्पीडिंगमुळे झाले आहेत.
जानेवारी ते मार्चदरम्यान झालेले अपघात
मार्ग : एकूण अपघात : प्राणांतिक अपघात : मृत्यू
- राष्ट्रीय महामार्ग : ३३ : २१ : २२
- राज्य महामार्ग : ९३ : ४५ : ५३
- अन्य मार्ग : ३८ : १६ : १७
- एकूण : १६४ : ८२ : ९२