अमरावती : राज्यस्तरीय शालेय मल्लखांब व नेटबॉल क्रीडा स्पर्धेचे आयोजन अमरावती येथे शुक्रवारपासून करण्यात आले आहे. तीन दिवस चालणा-या या स्पर्धेचे उद्घाटन पालकमंत्री प्रवीण पोटे व नगरविकास राज्यमंत्री रणजीत पाटील यांच्या हस्ते हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या प्रांगणात सकाळी ९ वाजता होईल. १२ ते १५ आॅक्टोबरदरम्यान आयोजित या स्पर्धेत राज्यातील सुमारे १ हजार खेळाडू सहभागी होणार आहेत. मल्लखांबमध्ये १९२, तर नेटबॉलमध्ये ८१६ विद्यार्थी-विद्यार्थिनी खेळाडू सहभागी होतील. दोन्ही क्रीडा स्पर्धा १४, १७ व १९ वर्षे वयोगटात विभागण्यात आल्या आहेत. या स्पर्धेत विजयी ठरणारे खेळाडू राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहेत, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी दिली.खेळाडू, क्रीडा प्रशिक्षक यांची निवास व भोजनाची व्यवस्था श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळासह शहरातील विविध ठिकाणी करण्यात आली आहे. स्पर्धेचा समारोपीय व बक्षीस वितरण कार्यक्रम १५ आॅक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता होईल. यावेळी जिल्हाधिकारी अभिजित बांगर व क्रीडा उपसंचालक प्रतिभा देशमुख उपस्थित राहतील.
स्पर्धेच्या आयोजनाच्या दृष्टीने आम्ही संपूर्ण तयारी केली आहे. बहुतांश खेळ बाहेर खेळविण्यात येतील मात्र, स्पर्धा कालावधीत पाऊस आल्यास सर्व स्पर्धा इनडोअर हॉलमध्ये घेण्यात येतील.- गणेश जाधव,जिल्हा क्रीडा अधिकारी, अमरावती