दुर्लक्ष : आघाडी सरकारच्या कार्यकाळातील फलक अद्यापही कायम अमरावती : राज्यात सत्तापालट होऊन एक वर्ष झाले. मात्र जिल्ह्याच्या मिनीमंत्रालयात अद्यापही राज्याच्या मागील आघाडी सरकारच्या कार्यकाळात महिला व बालकल्याण मंत्री असलेल्या वर्षा गायकवाड यांच्या नावाचा उल्लेख असलेले फलक जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या इमारतीवर मोठ्या दिमाखाने झळकत आहे. याकडे कुणाचेही लक्ष नसून प्रशासन किती सजग आहे, याचा परिपाक या निमित्ताने अनुभवास येत आहे. राज्य शासनाच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत राजमाता जिजाऊ आरोग्य व पोषण आहार अभियान राबविण्यात येत आहे. या उपक्रमाची माहिती दर्शविणारे भले मोठे फलक जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाने जिल्हा परिषदेच्या आवारात नागरिकांच्या माहितीसाठी लावले आहे. सदर योजना व अभियान मागील आघाडी सरकारच्या कार्यकाळात सुरू झाल्याने या माहिती दर्शविणाऱ्या फलकावर तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, महिला व बालकल्याण मंत्री वर्षा गायकवाड व याच विभागाच्या राज्यमंत्री फौजिया खान या चार मंत्र्यांचे छायाचित्र या माहिती फलकावर आद्यापही झळकत आहे. राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजप -शिवसेनेचे युती सरकार सत्तारुढ झाल्यानंतरही शासकीय कार्यालयांत मात्र जुन्या आघाडी सरकारचाच बोलबाला कायम असल्याचा प्रत्यय या निमित्ताने स्पष्ट दिसून येत आहे. एकीकडे राज्य शासन शासकीय योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी जनजागृतीच्या नावावर लाखो रुपये खर्च करते. मात्र सरकारी काम व दफ्तरदिरंगाईत 'थांब' या म्हणीप्रमाणे प्रशासकीय यंत्रणा जनहितासाठी किती जागरूक आहे, हे यावरुन दिसून येते. ग्रामीण भागाशी नाळ जुळलेल्या जिल्हा परिषदेत एवढी मोठी अनभिज्ञता सर्वांच्या दृष्टीस पडत असताना जिल्हा परिषदेच्या संबंधित विभागाच्या अधिकारी किंवा पदाधिकाऱ्यांच्या दृष्टीस पडू नये, हा आश्चर्याचा विषय ठरला आहे.
राज्याच्या महिला, बालकल्याण मंत्री वर्षा गायकवाडच !
By admin | Published: August 19, 2015 12:48 AM