अमरावती : राज्यात एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात २८ टक्के नागरिकांना तंबाखू सेवनाने मुख कर्करोग (कॅन्सर) झाल्याचा अहवाल शासनाकडे प्राप्त झाला आहे. त्याअनुषंगाने मौखिक कॅन्सर पूर्वावस्थेत ओळखण्यासाठी ३० वर्षांवरील नागरिकांची मुख कॅन्सर तपासणी मोहीम सुरू केली जात आहे. त्याकरिता मिशन १.२५ कोटी असून १ ते ३० डिसेंबर याकालावधीत विशेष मोहीम राबविली जाणार आहे.आरोग्य विभागाने ‘मुख स्वास्थ तपासणी मोहीम’ ही युद्धस्तरावर राबविण्यासाठी बैठकांचे सत्र चालविले आहे. या मोहिमेत खासगी संस्था, डॉक्टर्स, दंत चिकित्सक, स्थानिक स्वराज्य संस्था, वैद्यकीय आरोग्य संघटना आदींचा सहभाग राहणार आहे. जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी ते वैद्यकीय आरोग्य अधिकारी आदींनी आपसात समन्वय साधून शहरी आणि ग्रामीण भागात मुख कॅन्सर तपासणीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे नियोजन करावे, अशा सूचना सार्वजनिक आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्या आहेत. तंबाखूचे सेवन करणे हे मुख कॅन्सरचे प्रमुख कारण असल्याबाबत शासनान शिक्कामोर्तब केला आहे. त्यामुळे मुख कॅन्सर पूर्वावस्थेत आढळल्यास तो कॅन्सरमध्ये परिवर्तीत होण्यापासून टाळता येईल, हे या मोहिमेचे मिशन आहे. राज्यात १.२५ कोटी मुख कॅन्सर तपासणीचे लक्ष असले तरी जिल्ह्यात ३० वर्षावरिल नागरिकांचे ‘स्क्रिनींग’ करण्यासाठी उपाययोजना आखण्याचे निर्देश आहे. त्यानुसार राज्यभरात शहर, गाव, खेड्यापासून तर वस्ती, वाड्यावर १ डिसेंबरपासून मुख कॅन्सर तपासणी मोहीम सुरू होणार आहे. एकूणच आरोग्य यंत्रणेने जोरदार तयारी सुरू केली असून वैद्यकीय अधिका-यांचे प्रशिक्षण, आशा आरोग्य कर्मचारी, आरोग्य सहायक आदींचे प्रशिक्षण घेतले जात आहे. मुख कर्करोग शोध, निदान, उपचार मोहिमेची जनजागृती, प्रचार व प्रसार करण्याच्या सूचना आरोग्य विभागाच्या आहेत.
शहरापासून तर गाव, खेड्यापर्यंत तोंडाचा कॅन्सर तपासणी मोहीम राबविली जाणार आहे. खासगी डॉक्टर्स, सामाजिक संघटना, शासकीय यंत्रणेच्या यात सहभाग असेल. अमरावती जिल्ह्यात ३० वर्षांवरील १२ लाख नागरिक तपासणीच्या केंद्रस्थानी आहे.- श्यामसुंदर निकम,शल्य चिकित्सक, जिल्हा सामान्य रूग्णालय, अमरावती