अमरावती : व्याघ्र प्रगणनेत महाराष्ट्र वनविभागाने मनमर्जीने काम करून अत्यंत चुकीची आणि त्रुटीयुक्त माहिती सादर केल्यामुळे देशभरातील वाघांचा आकडा नेमका किती, हे समोर येण्यास विलंब होत आहे. दिल्ली येथील राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाने महाराष्ट्रात नव्याने वाघांची प्रगणना करण्याचे निर्देश दिले. परंतु, ऑक्टोबरमध्ये होणारी प्रगणना पावसामुळे लांबली. राज्यात बिबट्यांची संख्या ४२२६ असल्याच्या आकडेवारीचा यात समावेश आहे.
दर पाच वर्षांनी देशभरात वाघ, बिबट्यांसह इतर वन्यजीवांची प्रगणना केली जाते. त्याअनुषंगाने एनटीसीएने फेब्रुवारी २०२२ मध्ये देशातील सर्वच राज्यांना वन्यजीव प्रगणना करण्याचे निर्देश दिले होते. व्याघ्र प्रकल्प, अभयारण्य, प्रादेशिक वनक्षेत्रात ऑनलाइन प्रगणना करण्यात आली. दरम्यानच्या काळात प्रगणनेचा डेटा एनटीसीएकडे सादर करण्यात आला. यात एनटीसीएने रॉ मोबाइल, डेक्टॉक्स, बॅकअप डेटा तपासणी केली असता राज्याच्या प्रादेशिक, व्याघ्र प्रकल्पअंतर्गत ६८ वन विभागाने चुकीचा डेटा सादर केल्याची धक्कादायक बाब एनटीसीएच्या लक्षात आली. त्यामुळे एनटीसीएने महाराष्ट्र वनविभागाला पुन्हा व्याघ्र प्रगणना करण्याचे निर्देश दिले आहेत. राज्याच्या वनविभागाच्या अक्षम्य चुकीमुळे देशपातळीवर वाघांची अचूक आकडेवारी जाहीर करता आली नाही, हे विशेष.
म्हणून प्रगणना पुढे ढकलली
एनटीसीएच्या पत्रानुसार, १० ऑक्टोबरपासून राज्यात व्याघ्र प्रगणना केली जाणार होती. तशी तयारीदेखील करण्यात आली. मात्र, १६ ऑक्टोबरपर्यंत राज्यात वादळ, वारा, पावसाची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे. त्यामुळे तूर्त प्रगणना पुढे ढकलण्याचा निर्णय वनविभागाने घेतला.
राज्यात ४,२२६ वनबीटमध्ये झाली प्रगणना
ऑनलाईन व्याघ्र प्रगणनेसाठी वनरक्षकांना फेब्रुवारी २०२२मध्ये विशेष प्रशिक्षण देण्यात आले होते. देशातील ३५ राज्यांनी प्रगणनेचा अचूक आकडा एनटीसीएला सादर केला. मात्र, राज्यात ४,२२६ वन बीटमध्ये प्रगणना करताना घोळ झाला आहे. यात अलिबाग २२७, गोंदिया २३६, मेळघाट व्याघ्र प्रकल्प २८०, नागपूर २३५, आलापल्ली १५२, गडचिरोली १५० असा वनबीटचा समावेश आहे. त्यामुळे वनरक्षकांना दिलेले ऑनलाईन प्रगणनेचे प्रशिक्षण कुचकामी ठरल्याने आता पुन्हा नव्याने प्रगणना होणार असल्याचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव विभाग पूर्व) बी. एस. हुडा यांनी ३ ऑक्टोबर २०२२ रोजी वनाधिकाऱ्यांना पत्राद्वारे कळविले आहे.
अशी चुकली वन्यजिवांची प्रगणना
अशी चुकली वन्यजिवांची प्रगणना राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने महाराष्ट्रातील प्रगणनेचा ऑनलाईन डेटा तपासणी केला असता, सहा दिवसांमध्ये वाघ, बिबट, गवा, हरीण, काळवीट व इतर वन्यप्राण्यांच्या चिन्हांची नोंद घेताना तीन दिवसात १५ किमी पायी चालणे अपेक्षित होते. मात्र, अनेक वनरक्षकांनी ते केले नाही. काहींनी वनबीटचा डेटा उपलब्ध केलेला नाही. एवढेच नव्हे तर काही वनकर्मचाऱ्यांनी वाहन वापरले. ट्रान्झीट लाईनवर सकाळी ९ वाजण्यापृूर्वी चालणे अपेक्षित असताना अनेक जणांनी दुपार निवडली. विविध आकाराच्या सॅम्पल प्लॉट पाचपेक्षा कमी ठिकाणची माहिती गोळा करण्यात आली. अशा अनेक त्रुटींवर एनटीसीएने बोट ठेवले आहे.