दर्यापूर (अमरावती) : शिवसेना तालुकाप्रमुख गोपाल अरबट व शिवप्रेमींनी रविवारी मध्यरात्री बसवलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा नगरपालिका प्रशासनामार्फत पोलिसांच्या प्रचंड बंदोबस्तात सोमवारी मध्यरात्री हटविण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्याला २४ तास होत नाहीत तोच प्रशासनामार्फत पुतळा मध्यरात्री हटविण्यात आला.
सोमवारी सकाळी ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच तालुक्यातील शिवप्रेमी दर्यापुरात दाखल झाले. शेकडोंच्या संख्येत शिवप्रेमींनी नगरपालिकेत मुख्याधिकारी पराग वानखडे यांच्याकडे धाव घेतली. तथापि, मुख्याधिकारी पालिकेत हजर नसल्याने त्यांच्यावतीने तहसीलदार योगेश देशमुख यांनी निवेदन स्वीकारले. गांधी चौकात शिवप्रेमींनी बसविलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास जागा मालक अथवा कुणाचा हस्तक्षेप, तक्रार नसताना प्रशासनाने मध्यरात्री महाराजांचा पुतळा हटविला. कोणालाही विश्वासात न घेता महाराजांचा पुतळा हटविण्यात आला. आपण कोणत्या कारणाने, कोणत्या कलमाअंतर्गत व कोणत्या नियमाने तो पुतळा हटविला याचे लेखी उत्तर आम्हांस देण्यात यावे, अशा आशयाचे निवेदन घेऊन शेकडो शिवप्रेमी नगरपालिकेत धडकले होते.
नगरपालिकेत यावेळी राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी, रहिमापूर, खल्लार, येवदा, दर्यापूरचे ठाणेदार व पोलीस कर्मचारी यांचा तगडा बंदोबस्त होता. यावेळी शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी, मनसे, प्रहार इत्यादी पक्षांचे व विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते निवेदन देतेवेळी उपस्थित होते.
पालकमंत्र्यांविरुद्ध घोषणाबाजी
नगरपालिकेच्या आवारात निवेदन घेऊन आलेल्या शिवप्रेमींनी पालकमंत्री यशोमती ठाकूर, स्थानिक आमदार बळवंत वानखडे तसेच मुख्याधिकारी पराग वानखडे यांच्याविरोधात घोषणाबाजी करीत आपला रोष व्यक्त केला.
अमरावतीतही महाराजांच्या पुतळ्यावरून रणकंदन
दरम्यान, राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीदिनी अपक्ष आमदार रवी राणा यांनी अमरावतीतील राजापेठ उड्डाणपुलावर छत्रपती शिवाजी महाराजांच पुतळा बसवला होता. मात्र, कुठल्याच प्रकारची परवानगी न घेता हा पुतळा बसविण्यात आल्याने काल पोलीस बंदोबस्तात हा पुतळा हटविण्यात आला. या प्रकरणानंतर अमरावतीत वातावरण चांगलेच तापले आहे. आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा यांना नजरकैदेतही ठेवण्यात आले होते. राणा दाम्पत्याच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी जमून जोरदार घोषणाबाजीही केली होती. याबाबत खासदार नवनीत राणा चांगल्याच आक्रमक झाल्या होत्या.