अमरावती : मास्कचा वापर, हातांची स्वच्छता व सोशल डिस्टन्स या त्रिसूत्रीच्या पालनाबरोबरच नागरिकांनी स्वत:च्या आरोग्य संरक्षणासाठी नियमित वाफ, चांगला आहार, कोविड सुसंगत जीवनशैलीचा अवलंब करणे आवश्यक आहे. याबाबत भरीव जनजागृतीसाठी जिल्ह्यात ‘माझे आरोग्य- माझी जबाबदारी’ अभियानांतर्गत सोमवारपासून ‘स्टीम सप्ताह’ पाळण्याचे आवाहन पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी शुक्रवारी येथे केले.
कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांबाबत पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. आमदार सुलभा खोडके, आमदार बळवंत वानखडे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बबलू देशमुख, माजी आमदार वीरेंद्र जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, पोलीस आयुक्त आरती सिंह, पोलीस अधीक्षक हरी बालाजी एन., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, महापालिका आयुक्त प्रशांत रोडे, जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप रणमले, इंडियन मेडिकल असोसिएशनचे राज्य कार्यकारिणी सदस्य डॉ. वसंत लुंगे, डॉ. अनिल रोहणकर, हरिभाऊ मोहोड, डॉ. दिनेश ठाकरे, डॉ. संदीप दानखडे आदी याप्रसंगी उपस्थित होते.
साथीचे संक्रमण रोखण्यासाठी नागरिकांनी कोरोना नियमावलीबरोबरच स्वच्छता व वाफ घेण्यासारख्या बाबींचे पालन करणे आवश्यक आहे, अशी बाब आरोग्यतज्ज्ञांनी या बैठकीत मांडली. त्यानुसार पुढील संपूर्ण सप्ताह ‘स्टीम सप्ताह’ म्हणून पाळण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी आमदार सुलभा खोडके, आमदार बळवंत वानखडे, माजी आमदार वीरेंद्र जगताप, डॉ. वसंत लुंगे, डॉ. अनिल राेहणकर यांनी स्टीम सप्ताह पाळण्याचे आवाहन केले.
----------------
बॉक्स
प्रत्येकाने स्वत:ची काळजी घेणे अत्यंत आवश्यक : पालकमंत्री
कोरोना या जीवघेण्या आजाराच्या परिस्थितीला आपण सामोरे जात आहोत. त्यात स्वत:ची काळजी घेणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यातील परिस्थिती पाहता, ही बाब प्रकर्षाने पाळली पाहिजे. त्यामुळे प्रत्येकाने बाहेरून आल्यावर हातांची व शरीराच्या स्वच्छतेसह नियमित वाफ घेतली पाहिजे. सर्व नागरिकांनी हा स्टीम सप्ताह पाळावा व आपल्या आरोग्याप्रति असलेली जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी केले.
--------------------------
- तर एक हजार खाटांचे नियोजन करू
जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. गरज पडल्यास जिल्ह्यात एक हजार खाटांच्या व्यवस्थेचे नियोजन आहे. कोरोना उपचारात आवश्यक ऑक्सिजन, रेमडेसिविर आदी बाबींच्या पुरेशा पुरवठ्यासाठी सर्वंकष प्रयत्न होत आहेत. गरजूंना त्याची उणीव भासू नये, यासाठी युद्धस्तरावर यंत्रणा राबविण्यात येत आहे. वरूड येथील आयटीआय येथे नवीन कोविड केअर सेंटर व मोर्शी येथील सेंटरमध्ये २० खाटा वाढविण्याचे निर्देश त्यांनी आरोग्य यंत्रणेला दिले.
--------------