कोरोना संसर्ग, आतापर्यंत ३५०, नागरिक, प्रशासन बिनधास्त
धारणी : मेळघाटातील वातावरण आरोग्यासाठी पोषक आहे. गेल्या १० महिन्यांपासून कोरोना विषाणूच्या अनुषंगाने सर्वत्र हाहाकार माजविला असताना, जंगलकपारीत राहणारे येथील नागरिक कोरोनापासून चार हात लांब होते. मात्र, पंधरवड्यापासून रुग्णसंख्येत वाढ होत आहे. आतापर्यंत ३५० कोरोनाग्रस्तांचे निदान झाले आहे.
अत्यंत विपरीत परिस्थिती असतानासुद्धा चारही बाजूने कोरोनाचे मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडत असताना धारणी आणि चिखलदरा या दोन आदिवासीबहुल क्षेत्रात कोरोना शिरू शकला नव्हता.मात्र, गेल्या पंधरवड्यापासून धारणी तालुक्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात समोर येत आहे. सोमवारी एकाच दिवशी १३ रुग्णांची भर पडली. आतापर्यंत शासनदप्तरी अधिकृत ३५० रुग्ण नोंदविण्यात आले असून, अशीच गती कायम राहिल्यास लवकरच कोरोनाची चौथ्या शतकाची वाटचाल तालुक्यात होणार आहे.
कोरोना रुग्णसंख्येत दिवसेंदिवस होणारी लक्षणीय वाढ बघता शासन, प्रशासन व नागरिक या गंभीर बाबीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे . नुकतेच जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी अमरावती जिल्ह्यात संचारबंदी लागू केली. मात्र, या निर्देशकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असून, कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काटेकोर पालन होत नसल्यामुळे लवकरच मेळघाटातसुद्धा कोरोना उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
--------------
आठवडी बाजार जोमात
धारणी तालुक्यात आठवडी बाजार पूर्ण जोमात भरत आहेत. धारणी शहरासह लगतच्या हरिसाल, बैरागड, चाकर्दा, टिटंबा, बिजुधावडी, सुसर्दा, कळमखार येथे आठवडी बाजार आयोजित होत आहेत. या आठवडी बाजारात मोठ्या संख्येने साहित्य खरेदी करण्यासाठी गर्दी वाढत आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची व दंड ठोठावण्याची गरज व्यक्त होत आहे.