अमरावती : शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेत विविध अभ्यासक्रमांना (ट्रेड्स) प्रवेशासाठी सुधारित वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. इयत्ता दहावीच्या पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना त्यासाठी प्रवेश मिळू शकेल, असे जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी क. श. विसाळे यांनी कळविले.
सर्व शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील अभ्यासक्रमांना प्रवेशासाठी अर्ज स्वीकारण्याची व अर्ज दुरुस्ती करण्याची प्रक्रिया उद्यापासून सुरू होत आहे. सुधारित वेळापत्रकानुसार ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज भरणे, दुरुस्ती व शुल्क जमा करण्याची प्रक्रिया १ जानेवारीला सुरू होऊन ४ जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत चालेल. गुणवत्ता यादी ५ जानेवारीला सायंकाळी ५ वाजता संकेतस्थळावर प्रसिद्ध होऊन उमेदवारांना एसएमएसद्वारे कळवले जाईल.
सर्व संस्थांमधील रिक्त जागा समुपदेशन फेरीद्वारे भरण्यासाठी उपलब्ध राहतील. उपलब्ध जागांचा तपशील २ जानेवारीला सायंकाळी पाचपूर्वी प्रसिद्ध करणे आवश्यक आहे. समुपदेशन फेरीसाठी १ ते ४ जानेवारीदरम्यान नोंदणी होईल. पाच तारखेला गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाल्यानंतर ६ व ७ जानेवारीला उमेदवारांना त्यांच्या गुणवत्ता क्रमांकानुसार समुपदेशनासाठी बोलावून त्यानुसार जागांचे वाटप करण्यात येईल. याच दोन दिवसांत निवड झालेल्या विद्यार्थ्यांची प्रमाणपत्रे तपासून प्रवेश देण्यात येईल.
संस्थास्तरीय प्रवेश फेरीनंतर खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये रिक्त राहिलेल्या जागा संबंधित खासगी संस्थांना त्यांच्या स्तरावर भरता येतील. याबाबत अधिक माहितीसाठी नजिकच्या संस्थेत संपर्क साधण्याचे आवाहन विसाळे यांनी केले आहे.