अमरावती : वेदनांचे डंख बसलेली व समाजहिताचे भान राखणारी प्रतिभा साहित्यात सत्त्व अन् स्वत्त्व उमटविते. या संमेलनाच्या माध्यमातून तमाम साहित्यिकांच्या लेखणीतून हेच उतरावे. त्यातून सामाजिक ममत्वाचा निर्झर अखंड प्रवाहित होत राहावा, अशी प्रांजळ अपेक्षा प्रथम नाभिक साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक व ज्येष्ठ पत्रकार गोपालकृष्ण मांडवकर यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्र नाभिक साहित्य कलादर्पण संघ, अमरावतीद्वारे येथील टाऊन हॉलमध्ये शनिवारी आयोजित प्रथम महाराष्ट्र नाभिक साहित्य संमेलनाचे अध्यक्षीय भाषण गोपालकृष्ण मांडवकर यांनी केले. व्यासपीठावर स्वागताध्यक्ष शरद ढोबळे, साहित्य अभ्यासक प्रकाश नागपूरकर, ज्येष्ठ साहित्यिक उत्तमराव बिडवे, शिवलिंग काटेकर, संजय येऊलकर, राजेंद्र अमृतकर, गोपाल कडूकर, श्याम आस्करकर, कल्पना निंबोकर, सुधीर राऊत, विशाल कान्हेरकर आदी उपस्थित होते.
नाभिक समाजाने आपले स्वत:चे साहित्य संमेलन घ्यावे, ही घटनाच मुळी साहित्यविश्वाला अचंबित करणारी आहे. साहित्य पोट भरल्यावर जन्माला येते, हा प्रवाद अमान्य आहे. असे असते, तर संत सेना महाराज, संत नगाजी महाराज यांची प्रतिभा फुलली नसती; गरिबी अन् अवहेलनांचे चटके सोसणारे राम नगरकर महाराष्ट्राचे लाडके झाले नसते, असे मांडवकर म्हणाले. आजवर कधी अनुभवली नाही अशी संक्रमणावस्था आपण अनुभवत आहोत. यातून स्वत:च्या हक्काची स्पेस निर्माण करण्याचे काम आपण करतोय. या बीजारोपणातून नाभिक समाजाचे सुदृढ अन् समाजहितैषी साहित्य उद्या निर्माण होईल, अशी ग्वाही मांडवकर यांनी दिली.
वंचित समाजघटकांपर्यंत सुखाची आणि समृद्धीची किरणं जेव्हा पोहचत नाहीत, तेव्हा विषमतेला सुरुवात होऊन समाजात दरी निर्माण होते. ती बुजविण्याचे काम या साहित्य संममेलनांच्या व्यासपीठावरून आपणास करावे लागेल, असे आवाहन मांडवकर यांनी केले. याप्रसंगी मुकुंद धजेकर, सुधीर राऊत, सुनीता वरणकर यांचा सत्कार करण्यात आला, तसेच विविध स्पर्धांतील विजेत्यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक विशाल कन्हेकर, संचालन प्रवीण बोपूलकर, वैष्णवी अतकरे यांनी केले.
नाभिक साहित्य संस्कृती मंडळाची स्थापना करावी
नाभिक समाजाच्या संस्कृतीचे संवर्धन व्हावे, यासाठी राज्य शासनाने नाभिक साहित्य संस्कृती मंडळाची स्थापना करावी अन् त्यासाठी अनुदान द्यावे, अशी मागणी करणारा ठराव या संमेलनात घेतला जावा, अशी अपेक्षा संमेनाध्यक्ष गोपालकृष्ण मांडवकर यांनी अध्यक्षीय भाषणात व्यक्त केली. त्याचे सर्वांनी स्वागत केले.
केवळ लेखन नव्हे, कृतीही महत्त्वाची
लेखकांनी केवळ लेखन न करता कृतीदेखील करावी. तेव्हाच लेखन ही माझी कृती आहे, असे लेखक म्हणू शकेल. समाजातील कलावंत, लेखक, पत्रकारांकडून कृतिशील व्यवहाराची अपेक्षा आहे, असे संमेलनाध्यक्ष म्हणाले.