धीरेंद्र चाकोलकर - अमरावती : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हातघाईस आलेल्या जिल्हा आरोग्य प्रशासनाने जिल्ह्यातील शासकीय सात कोविड सेंटरला २२ हजार रेमडेसिविर वितरित केल्या आहेत. संभाव्य तिसऱ्या लाटेच्या संकटाला सामोरे जाण्याकरिता सतर्क असून, १३ हजार रेमडेसिविर इंजेक्शनचा स्टॉक अबाधित ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कोरोना रुग्णांना द्यावी लागणारी अत्यंत महत्त्वाचे व महागडे रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार होऊ नये, सामान्यांची लूट होऊ नये, या उद्देशाने शासनामार्फतच ते जिल्हाधिकाऱ्यांद्वारा गठित समितीच्या मार्गदर्शनात वितरित करण्यात आले. यामध्ये जिल्ह्यातील अचलपूर, नांदगाव, मोर्शी, तिवसा, धारणी, चिखलदरा व स्थानिक सुपर स्पेशालिटीतील कोविड रुग्णालयात उपचारार्थ दाखल रुग्णांना ते इंजेक्शन देण्यात आले.
कोट
आपल्या जिल्ह्याला शासनाकडून तीन टप्प्यात २५ हजार रेमडेसिविर व्हायल प्राप्त झाल्या, तर १० हजार रेमडेसिविर खरेदी करण्यात आल्या होत्या. त्यापैकी २२ हजार व्हायल रुग्णांसाठी वापरण्यात आल्या. १३ हजार व्हायल संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने स्टॉक शिल्लक आहेत.
- डॉ. श्यामसुंदर निकम, जिल्हा शल्यचिकित्सक
--
तीन टप्प्यात रेमडेसिविर प्राप्त
जिल्ह्यात सात शासकीय कोविड सेंटर स्थापन केले होते. यासाठी शासनाकडून पहिल्या टप्प्यात ७ हजार रेमडेसिविर प्राप्त झाल्यात. दुसऱ्या टप्प्यात १५ हजार आणि तिसऱ्या टप्प्यात १३ हजार यामध्ये १० हजार रेमडेसेविर खरेदी केलेल्या आहेत. खासगी रुग्णालयांना लागणाऱ्या रेमडेसिविरसाठी एफडीए विभागातील
--
खासगी रुग्णालयांना १६ हजार रेमडेसिविर
जिल्ह्यात खासगी कोविड रुग्णालये ४० होती. तेथील रुग्णांना निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या समितीमार्फत १६ हजार रेमडेसिविर देण्यात आले. दरम्यान, रेमडेसिविरचा तुटवडा भासल्याने अकोला येथून ३ हजार रेमडेसिविर मागविण्यात आल्या होत्या, त्या नंतर परत केल्याची माहिती एफडीएचे सहा. आयुक्त मनीष गोतमारे यांनी दिली.