अमरावती : घरफोडी करणाऱ्या तीन अट्टल चोरांना गुन्हे शाखेच्या युनिट दोनने ९ नोव्हेंबर रोजी अटक केली. त्यांनी दोन गुन्ह्यांची कबुली दिली. त्यांच्याकडून २ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींकडून आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्यता असल्याने त्यांची कसून चौकशी सुरू आहे. त्यांनी दिवाळीआधी एका बांधकामस्थळाहून पेंट चोरला होता.
आरोपींमध्ये साहिल कैलास राऊत (२१, रा. गांधी आश्रम), विक्की अरुण सरकटे (२३, रा. पुष्पक कॉलनी) व ओम उर्फ नागो गोपाल नागरीकर (१८, रा. वल्लभनगर क्रमांक २) यांचा समावेश आहे. दस्तुरनगर परिसरातील जयंत कॉलनी येथील रहिवासी एका नागरिकाच्या बंद घराच्या मागील लाकडी दरवाजा तोडून एक ड्रिल मशीन, एक ब्रेकर मशिन, पाण्याची मोटार व कलर पेंटच्या ४ बकेट असा एकूण ५५ हजार रुपयांचा रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला होता. या प्रकरणी तक्रारीवरून ७ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करून फ्रेजरपुरा पोलिसांनी तपास आरंभला. गुन्हे शाखेचे युनिट दोनही या गुन्ह्याचा समांतर तपास करीत होते.
दोन गुन्ह्याची कबुली
तपासादरम्यान या गुन्ह्यात साहील राऊत, विक्की सरकटे व ओम नागरीकर यांचा हाथ असल्याचे समोर आल्यावर त्यांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. चौकशीत त्यांनी कबुली दिली. सोबत आणखी एक गुन्हा केल्याचे कबुल केले. त्यानुसार त्यांच्याकडून कलर पेंटच्या ४ बकेट, पाण्याची मोटार, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी व दुसऱ्या गुन्ह्यातील कॅमेरा असा जप्त करण्यात आला.
यांनी केली कारवाई
ही कारवाई गुन्हे शाखेच्या युनिट दोनचे पोलीस निरीक्षक राहुल आठवले यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश इंगोले, पोलीस उपनिरीक्षक राजकिरण येवले, राजेंद्र काळे, संजय वानखडे, जावेद अहेमद, दीपक सुंदरकर, गजानन ढेवले, एजाज शहा, संग्राम भोजने, चेतन कराडे, राजीक रायलीवाले, योगेश पवार, नीलेश वंजारी, संदीप खंडारे यांनी केली.