अमरावती : सलग दुसऱ्या वर्षीही कारोनाने डोके वर काढल्याने बारा बलुतेदारांचा व्यवसाय धोक्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. यात बांगड्यांचा व्यवसाय करून उपजीविका चालविणाऱ्यांवर कोरोनाची कुऱ्हाड कोसळली आहे. एकीकडे पोट भरण्याची चिंता, तर दुसरीकडे कोरोनाची भीती यामुळे या दुहेरी संकटात बांगडी व्यावसायिक सापडला आहे.
कोरोना संसर्गामुळे संपूर्ण जगावर संकट कोसळले असून, गत दोन वर्षांपासून कोरोनाच्या सावटाखाली जनता अक्षरश: भरडली जात आहे. सर्व सण, उत्सव, सार्वजनिक कार्यक्रम यात लग्न समारंभावरही शासनाने निर्बंध घातल्याने अनेक बारा बलुतेदारांची उद्योगधंदे बंद आहेत. एप्रिल, मे या दोन महिन्यात लग्नसराई दरवर्षी मोठ्या प्रमाणात असते. पण सलग दुसऱ्या वर्षी या दोन महिन्यातच कोरोनामुळे हा हंगाम न झाल्याने यावर अवलंबून असणाऱ्या व्यावसायिकांवर उपासमारीचे संकट आले आहे. लग्नसराईमध्ये दोन-तीन महिने व्यापार करून बाकीच्या काळात बऱ्यापैकी व्यवसाय झाला तरी कुटुंबाचा उदरनिर्वाह वर्षभर उत्तमप्रकारे होत होता. परंतु लग्नकार्यात बांगडी भरूनच लग्नकार्याची मुहूर्तमेढ रोवली जाते. परंतु दोन वर्षांपासून विवाह समारंभ ही फिजिकल्स डिस्टन्सिंगमुळे कमी गर्दी करून मोजक्या नातेवाईकात पार पाडण्याचे शासनाचे आदेश आहेत. या नियमांचे चौकटीत विवाह समारंभ होत आहेत. बाकी रीतीरिवाजाला फाटा दिला जात आहे. त्यामुळे अनेक व्यावसायिकांचा व्यवसाय बुडाला आहे. यामध्ये बांगडीवाले, बँडवाले, घाेडेवाले, डेकोरेशन सजावट करणारे, फोटोग्राफर, भांडी, फर्निचर, पार्लर व्यवसायिक, सौंदर्यप्रसाधने लेडीजशॉप, मंगल कार्यालय व इतर व्यावसायिक व्यवसाय बंद असल्याने आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
बॉक्स
व्यावसायिकांसमोर आर्थिक संकट
काही व्यवसायाचा ऑनलाईन व्यवसाय सुरू असून यात मोजक्याचा व्यवसायाचा समावेश आहे. मात्र बांगडी हा व्यवसाय असा एक मात्र आहे की, तो फिजिकल्स डिस्टंसिंग पाळून करता येणे शक्य नाही. ग्राहकाला बांगड्या भरावयाच्या म्हटलं तर जवळून संपर्क येतो. त्यामुळे सोशल डिस्टन्स पळता येत नाही व कोरोनापासून संरक्षण करून हा व्यवसाय करणे या व्यावसायिकांसमोर एक दिव्यच आहे. एकीकडे पोट भरायची तर चिंता तर दुसरीकडे कोरोनाची भीती यामुळे हे व्यावसायिक आर्थिक संकटात सापडल्याचे व्यावसायिक प्रमोद मेश्राम यांनी सांगितले.