लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : अजगर पकडायला गेलेल्या चार अज्ञात युवकांनी त्याला दगडाने ठेचून काढले. काडीने टोचले तरीही चार दिवसानंतर तो अजगर जिवंतच आढळला. त्याच्यावर वनविभागाकडून उपचार केला जात आहे.जखमी अवस्थेतील या अजगराला तब्बल चौथ्या दिवशी परतवाड्यातील मोनू इर्शिद, ऋषीकेश भगत, अर्जुन उपाध्याय यांनी घटनास्थळावरून परतवाडा वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या कार्यालयात दाखल केले. तेथे या अजगरावर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शिंदे यांनी औषधोपचार केलेत. जखमांवर औषधी लावून ड्रेसिंगही केले.प्राप्त माहितीनुसार, परतवाडा- बैतुल रोडवरील पंचशील आश्रमशाळेलगत २ सप्टेंबरला या अजगराला चार युवकांनी पकडण्याचा प्रयत्न केला. याकरिता जवळच असलेल्या शेतातील रहिवाशांकडे त्यांनी रिकामे पोते मागितले. पोत्यात अजगराला टाकत असताना तो त्यातील एकाला चावा घेतला. त्यामुळे त्यांनी त्याला दूर लोटले. राग अनावर झालेल्या त्या संतप्त युवकांनी त्याला दगडांनी ठेचून काढत तेथून पळ काढला.जखमी स्थितीत अजगर त्याच परिसरात निपचित पडून राहिला. रस्त्याच्या कामावरील लोकांचे ५ सप्टेंबरला त्याच्याकडे लक्ष गेले. त्यांनी याची माहिती परतवाड्यात दिली. माहिती मिळताच मोनू इर्शिद, ऋषीकेश भगत, अर्जुन उपाध्याय घटनास्थळी दाखल झालेत. या जखमी अजगराला घेवून जाण्याकरीता मोनू इर्शिद यांनी त्याच शेतातील रहिवाशाकडे रिकाम्या पोत्याची मागणी केली तेव्हा या घटनेचा उलगडा झाला. जखमी अजगरावर वनपाल डी.सी. लोखंडे, वनरक्षक प्रवीण निर्मळ यांच्या उपस्थितीत डॉ. शिंदे यांनी औषधोपचार केला. या अजगराची प्रकृती चिंताजनक आहे. प्रकृतीत सुधारणा होताच त्याला हत्तीघाटच्या जंगलात सोडले जाणार आहे.दरम्यान, अमरावती मार्गावर ५ सप्टेंबरला पहिलवानबाबा लगत सहा ते सात फूट लांबींच्या अजगराला मारून मुख्य रस्त्यावर वेटोळे घातल्यागत ठेवले होते. सकाळी ११.३० वाजताचे दरम्यानच्या या घटनेनंतर काही सुज्ञ मंडळींनी त्या मृत अजगराला रस्त्याच्या कडेला ठेवले.
दगडांचा मार; अजगर मरणासन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2019 6:00 AM
जखमी अवस्थेतील या अजगराला तब्बल चौथ्या दिवशी परतवाड्यातील मोनू इर्शिद, ऋषीकेश भगत, अर्जुन उपाध्याय यांनी घटनास्थळावरून परतवाडा वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या कार्यालयात दाखल केले. तेथे या अजगरावर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शिंदे यांनी औषधोपचार केलेत. जखमांवर औषधी लावून ड्रेसिंगही केले.
ठळक मुद्देपरतवाड्याची घटना : पकडताना चावा घेतल्याने युवकांचे कृत्य, औषधोपचाराला प्रतिसाद