लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : येथील संत गाडगेबाबा विद्यापीठात कंत्राटदारांमार्फत काम करणाऱ्या महिला मजुरांवर वेतनाविषयी अन्याय होत असून, त्यांना शासन निर्णयाप्रमाणे वेतन अदा करावे, अशी मागणी शिवसेनेचे उपशहर प्रमुख अमोल निस्ताने यांनी केली. आठ दिवसांत हा प्रश्न सोडविला नाही तर, विद्यापीठात तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांना रोजंदारी महिलांच्या प्रश्नाबाबत शिवसेनेने निवेदन दिले. विद्यापीठ परिसराची स्वच्छता, झाडांची निगा राखणे, कामांसाठी कंत्राटदारांकडून रोजंदारी तत्त्वावर महिलांना कर्तव्यावर नेमले आहे. मात्र, त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात कामे करवून घेतल्यानंतरही त्यांना ७० रूपयांप्रमाणे रोजंदारी दिली जाते. शासन निर्णयाप्रमाणे रोजंदारी महिलांना वेतन अदा करणे अनिवार्य असताना कंत्राटदारकडून अल्प वेतन देण्याचा प्रकार सुरू आहे. रोजंदारी कामांसाठी गरजू, घटस्फोटित, विधवा, गरीब कुटुंबातील महिलांचा समावेश आहे. दिवसभर कष्ट करून ७० रूपये रोजंदारी ही बाब अन्यायकारक आहे. कंत्राटदारांकडून रोजंदारी महिलांची आर्थिक फसवणूक होत असून, ती तत्काळ थांबवून अन्यायग्रस्त महिलांना जीआर नुसार रोजंदारी अदा करावी, अशी मागणी अमोल निस्ताने यांनी केली आहे. महिलांवरील अन्याय दूर न झाल्यास कंत्राटदाराविरुद्ध पोलिसात तक्रार देऊन फौजदारी दाखल करू, असा इशारा देण्यात आला. विद्यापीठात वर्षांनुवर्षे एकाच कंत्राटदारांना कशी कंत्राट मिळतात, याकडे देखील निस्ताने यांनी कुलगुरूंचे लक्ष वेधले. यावेळी संजय देशमुख, दीपक उके, आदित्य बोंडे, अमित चुमळे, गोपाल ढोके, छोटू इंगोले यांच्यासह अन्यायग्रस्त महिला हजर होत्या.
विद्यापीठात रोजंदारी महिलांवरील अन्याय थांबवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 11:42 PM
येथील संत गाडगेबाबा विद्यापीठात कंत्राटदारांमार्फत काम करणाऱ्या महिला मजुरांवर वेतनाविषयी अन्याय होत असून, त्यांना शासन निर्णयाप्रमाणे वेतन अदा करावे, अशी मागणी शिवसेनेचे उपशहर प्रमुख अमोल निस्ताने यांनी केली. आठ दिवसांत हा प्रश्न सोडविला नाही तर, विद्यापीठात तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
ठळक मुद्देशिवसेनेचे कुलगुरूंना साकडे