लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : टंचाईच्या काळात जनावरांचा चाऱ्याचा उपयोग व्हाइट कोल बनविण्यासाठी करू नये, असे निर्देश तहसीलदार राजेंद्र इंगळे यांनी कारखाना मालकांना दिले आहेत. त्याबाबतचे एक लेखी पत्र त्यांना पाठविण्यात आले. उन्हाळ्यात चारा टंचाई स्थिती निर्माण होत असताना स्थानिक तहसील कार्यालयात चारा व पाणीटंचाईसंदर्भात सभा घेण्यात आली. त्यात हे निर्देश देण्यात आले.तालुक्यात ६४११ मोठी व १६ हजार ७९ लहान जनावरे आहेत. शेळ्या-मेंढ्यांंची संख्या ७८८८ इतकी आहे. त्यांना ५० हजार २४७ मेट्रिक टन चाऱ्याची आवश्यकता असल्याचे पशुसंवर्धन अधिकारी पुंड यांनी सांगितले. आमला मंडळामध्ये जून महिन्यात चाराटंचाईसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते, तर इतर मंडळात चारा उपलब्ध आहे. तालुक्यातील कारला, लालखेड, पळसखेड येथे व्हाइट कोल बनविण्याचे कारखाने आहेत. त्याठिकाणी कच्चा माल म्हणून वनस्पतींचा टाकाऊ भाग वापरला जातो. त्यासोबतच सोयाबीन, तूर, गहू यांचे कुटार वापरले जाते. परंतु, सदर कुटार हे जनावरांच्या उपयोगाचे आहे. त्यामुळे तहसीलदार राजेंद्र इंगळे यांच्या निर्देशाप्रमाणे मंडळ अधिकाऱ्यांनी संबंधित कारखान्याला भेट देऊन पंचनामा केला तसेच जनावारांच्या चाऱ्याचा व्हाईट कोलसाठी उपयोग करू नये, याबाबतचे पत्र दिले.पुढील हंगामाचा चारा उपलब्ध होईपर्यंत जमा कुटारसुद्धा वापरू नये, याशिवाय जनावरांच्या चाऱ्याचा इतर कोणत्याही प्रकारचा वापर करू नये. आग, पावसापासून चारा सुरक्षित ठिकाणी ठेवावा, सोयाबीन, तूर, गहूचे कुटार जाळून टाकू नये व पुढील हंगामातील चारा उपलब्ध होईपर्यंत जपून ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
काय आहे व्हाईट कोल?पर्यायी इंधन म्हणून शेतातील काडी-कचऱ्यापासून तयार होणाऱ्या ‘व्हाइट कोल’ने ऊर्जेची गरज भागविली जाऊ शकते, कापूस, पºहाटी, सोयाबीन भुसा, धानाचा भुसा, शेंगदाणा, एरंडीची टरफले, लाकडी भुसा, गव्हाचा भुसा, सूर्यफुलांचे टरफल, उसाचे चिपाड, तागाचा चोथा, कुटार आदींपासून ब्रिकेट्स (व्हाइट कोल) तयार केले जातात. व्हाइट कोल हे बायोकोल ऊर्जेचे घनस्वरूप आहे.