जिल्हा कचेरीवर उपोषण : राज्य शासनाविरोधात एल्गारअमरावती : आरोग्य सेवा पुरविण्याऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी ‘गट अ’ संघटनेच्यावतीने उपोषणाला सुरुवात करण्यात आली. या काम बंद आंदोलनामुळे शासकीय रुग्णालयातील रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. महाराष्ट्रातील जवळपास ८० टक्के नागरिकांना आरोग्य सेवा पुरविणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मागण्याकडे शासन दुर्लक्ष करीत आहे. आरोग्य विभागात जवळपास १२ हजार वैद्यकीय अधिकारी कार्यरत असून त्यांचा कामबंद आंदोलनात सहभाग आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मागण्या प्रदीर्घ काळापासून प्रलंबित आहेत. याकरिता २ जून रोजी असहकार आंदोलन सुरु केले होते. त्यावेळी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी तत्काळ दखल घेऊन संघटनेशी चर्चा करुन १० दिवसांच्या आत प्रमुख मागण्याची अमलबजावणी करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते. या पार्श्वभुमीवर मॅग्मो संंघटनेने शासनावर विश्वास ठेऊन २० जून २०१४ पर्यंत संघटनेच्या प्रमुख मागण्यांच्या अमलबजावणीकरिता शासनाला पुरेसा वेळ दिला होता. मात्र शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करुनही शासनाकडून आश्वासनाशिवाय वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या काही पदरी पडले नाही. त्यामुळे पुन्हा मॅग्मो संघटनेने आंदोलनाचा पावित्रा घेतला आहे. मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मॅग्मो संघटनेकडून पुन्हा असहकार आंदोलन सुरु केले आहे. संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकारी प्रमोद रक्षमकर, एकनाथ भोपले, महिला सचिव उज्ज्वला पाटील, उमाकांत गरड, अश्विन पाटील, राजेश गायकवाड यांच्यासह अनेक वैद्यकीय अधिकाऱ्यांचा आंदोलनात सहभाग आहे.
वैद्यकीय अधिकाऱ्यांचे काम बंद आंदोलन
By admin | Published: July 01, 2014 11:14 PM