अमरावती - पैसे मागण्याच्या कारणावरून दहा तृतीयपंथीयांनी रेल्वे प्रवाशालाच बेदम मारहाण केल्याची घटना माना ते मूर्तिजापूरदरम्यान शनिवारी सकाळी ६ वाजता घडली. कविगुरू संत्रागाची पोरबंदर सुपरफास्ट एक्सप्रेस थांबवून हा प्रकार केल्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. बडनेरा रेल्वे पोलिसांनी तृतीयपंथीयांविरुद्ध दरोड्याचा गुन्हा नोंदविला. हनुमानसिंग जगतनाथसिंग ठाकूर (२४,रा.सुरत, मूळ रहिवासी चिलबिल, जि. चितकुट, उत्तरप्रदेश) असे गंभीर जखमी प्रवाशाचे नाव आहे. या घटनेत रेल्वेतून उडी मारणारा तृतीतपंथी मंगला गुरुजारा (३०,रा.अमरावती) हा गंभीर जखमी झाला. दोघांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले आहे. कविगुरु संत्रागाची पोरबंदर सुपर फास्ट एक्सपेसमधील इंजिनजवळच्या जनरल डब्यात मंगला व इतर दोन तृतीयपंथी प्रवाशांकडे पैसे मागत होते. दरम्यान त्यांनी एका डब्यातील बर्थसिटवर झोपलेल्या हनुमानसिंग ठाकूर या प्रवाशाला उठवून पैसे मागितले. त्याने पैसे देण्यास विरोध दर्शविल्यानंतर तृतितपंथ्यांनी जोरजबरदस्ती करण्याचे प्रयत्न केले. त्यामुळे हनुमानसिंग व तृतीतपंथीचा वाद सुरु झाला. काही क्षणातच वाद उफाळून आल्यावर हनुमानसिंग व तृतीतपंथ्यांची हाणामारी सुरू झाली. दरम्यान मंगला याने धावत्या रेल्वेतून बाहेर उडी घेतली. हा प्रकार रेल्वेतील आठ ते दहा तृतीतपंथीयांना कळला असता त्यांनी तत्काळ चैन ओढून रेल्वे थांबविली. त्यांनी मंगलाला मारणाऱ्याचा शोध सुरू केला. तृतीतपंथीयांनी हनुमानसिंगला रेल्वे डब्ब्यातून ओढून बाहेर काढले आणि बेदम मारहाण केली. त्यामुळे हनुमानसिंग पळत महिलांच्या डब्यात शिरला. मात्र, तृतीयपंथीयांनी तेथूनही हनुमानसिंग याला बाहेर ओढून गाडीखाली पुन्हा बेदम मारहाण केली. या घटनेच्या माहितीवरून रेल्वे पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर काही अंतरावर पडून असलेल्या मंगला व जखमी हनुमानसिंगला रेल्वेत टाकून बडनेरा रेल्वेस्थानकावर आणण्यात आले. तेथून त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. तक्रारीवरून बडनेरा रेल्वे पोलिसांनी आरोपी मंगलासह दहा तृतीयपंथीयांविरुद्ध भादंविच्या कलम २९५अन्वये गुन्हा नोंदविला. याप्रकरणात बडनेरा पोलीसांनी झिरोची डायरी कायमी करून हे प्रकरण अकोला रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन केले. नऊ तृतीतपंथी अटकहनुमानसिंगला मारहाण केल्याप्रकरणात बडनेरा रेल्वे पोलिसांनी नऊ तृतीतपंथीयांना अटक केली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात रेल्वे पोलिसांनी जखमी हनुमानसिंग व मंगला यांचे बयाण नोंदविले. यावेळी सुरक्षा बलाचे सी.एच.पटेल, सहायक पोलीस निरीक्षक पंकजकुमार चक्रे, पोलीस उपनिरीक्षक राजेश नागरे, मुर्तीजापूर जीआरपीएफचे पोलीस उपनिरीक्षक अनिल खारोडे यांच्यासह पोलीस कर्मचारी शंकर निहारे, प्रभाकर कांबळे, सुरेंद्र गोहार, अरुण खांडेकर, सुनील कुमार उपस्थित होते.
गाडीत एकही पोलीस नसल्याने प्रवासी संतप्तकविगुरु संत्रागाची पोरबंदर सुपर फास्ट एक्सपेसमध्ये ही घटना घडल्यानंतर प्रवाशांना सुरक्षिततेसाठी रेल्वे पोलिसांची आस लागली होती. मात्र, तेथे तब्बल एक तासापर्यंत एकही पोलीस फिरकला नाही. त्यामुळे या गाडीत एकही रेल्वे पोलीस नसावा का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.