दर्यापूर : जिल्ह्यात रविवारपासून कडक निर्बंध लागू केल्याने शनिवारी येथील बाजारपेठेत तुफान गर्दी पाहायला मिळाली. जिल्ह्यात ९ ते १५ मे दरम्यान सात दिवसांचा कडक लॉकडाऊन असल्याने नागरिकांनी जीवनावश्यक वस्तूंक्या खरेदीसाठी बाजारपेठेत तुफान गर्दी केली होती. लॉकडाऊन पुढेे किती दिवस चालणार या भीतीपोटी नागरिकांनी किराणा दुकानांत प्रचंड गर्दी केल्याचे शनिवारी दिसून आले.
शहरात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वर्दळ होती. दुकानदारांना विनवणी करीत नागरिकांनी दुकानासमोर वस्तू खरेदीसाठी अक्षरशः रांगा लावल्या होत्या. जयस्तंभ चौक, गांधी चौक, शिवाजी चौक, आठवडी बाजारात हाऊसफुल गर्दी दिसून आली. यावेळी कोणालाही कुणाची भीती नसल्याचे दिसून आले. किराणा दुकानांत तसेच भाजीपाला मार्केटमध्ये विनामास्क फिरणाऱ्यांवर नगरपालिका तसेच पोलिसांमार्फत कारवाई करण्यात आली.