फोटो पी १७ मुगलाईपुरा
पान २ चे लिड
परतवाडा : रविवारी सायंकाळी झालेल्या वादळी पावसाचे पाणी परतवाडा शहरातील मुगलाईपुरा येथे अनेक लोकांच्या घरात शिरले. या पाण्यासोबतच मोहल्ल्यातील घाण, कचरा आणि नालीतील पाणीही या नागरिकांच्या घरात पोहचले होते. मुगलाईत सर्वत्र पावसाचे पाणी गोळा झाले होते. यात त्यांच्या घरातील साहित्य ओले झाले. घरात घुसलेले पाणी रात्री उशिरापर्यंत त्यांना उपसावे लागले.
अरबी समुद्रात उठलेले तौक्ते चक्रीवादळ रविवारी कोकणपट्टीत धुमाकूळ घालत गुजरातच्या दिशेने पुढे सरकले. त्यामुळे राज्यात शनिवार रात्रीपासून वादळी वाऱ्यासह सुरू झालेल्या पावसाने प्रामुख्याने रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना जोरदार तडाखा दिला, तर अमरावती जिल्ह्यातही वादळी पावसाचा फटका बसला. अचलपूर नगरपालिका क्षेत्रातील अनेक सखल भागात पावसाचे पाणी साचले होते. घरासमोरील रोडवर फूट-दीड फूट पाणी थांबल्यामुळे लोकांना काही काळ घराच्या बाहेर पडता आले नाही.
अचलपूर शहरातील बिलनपुरा येथील संन्यासपेंड रोडला लागून असलेले जगतराव पोटे यांचे घर या वादळी पावसामुळे कोसळले. यात घरातील मंडळी थोडक्यात बचावली. पण, घरातील साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. घर पडल्यामुळे हे पोटे कुटुंबीय उघड्यावर आले आहे.
दरम्यान, वादळी पावसाने जवर्डी, शेकापूर येथे केळी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. केळीची पाने वादळामुळे फाटली, तर काही झाडे कोलमडून पडली आहेत. याचा परिणाम केळी उत्पादक शेतकऱ्यांना भोगावा लागणार आहे. या विषयीची माहिती स्वतः बाधित शेतकऱ्यांनी कृषी विभागाला दिली आहे.
कोट:
वादळी पावसामुळे केळी पिकाचे नुकसान झाल्याची माहिती आहे. लॉकडाऊन आणि कडक निर्बंध व त्यातच कार्यालये बंद यामुळे माहिती गोळा करण्यास विलंब होत आहे. माहिती घेतली जात आहे.
- प्रफुल्ल सातव, तालुका कृषी अधिकारी,अचलपूर
कोट २
जवर्डी येथे वादळी पावसाने केळीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याची माहिती आम्ही तालुका कृषी अधिकाऱ्यांना दिली आहे.
- शिवबा काळे, सरपंच, जवर्डी