महापालिका आयुक्तांचा पुढाकार : पंधरवड्यात ‘डीपीआर’ येणारप्रदीप भाकरे अमरावतीनाल्यांमधून वाहून जाणाऱ्या सांड पाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी उपयोगात आणण्याच्या दिशेने महापालिकेने पुढाकार घेतला आहे. यासाठी ‘स्टॉर्म वॉटर ड्रेनेज सिस्टिम’ विकसित करण्याकडे पावले उचलले गेले आहेत. या नवीन प्रणालीचा ‘डीपीआर’ या पंधरवड्यात पालिकेला प्राप्त होणार आहे. पर्यावरणपूरक आणि आरोग्याच्या दृष्टीने स्टॉर्म वॉटर ड्रेनेज सिस्टिम कार्यान्वयनाबाबत आयुक्तांनी पुढाकार घेतला आहे. डीपीआरमध्ये काय ?स्टॉर्म वॉटर ड्रेनेज सिस्टिम कार्यान्वित करण्यासाठी खासगी कंपनीकडून डीपीआर बनविला जात आहे. यात ड्रेनेजसंदर्भात प्रत्येक बाबींचा उहापोह होणार आहे. नाल्यांचे बांधकाम करून ते पाणी अडवायचे, जमिनीत मुरवायचे, प्रक्रिया करून जवळच्या बगिच्यासह अन्य ठिकाणी वापरता येईल का? या बाबींचा सूक्ष्म अभ्यास केला जाणार आहे. छोटे नाले चांगले झालेत तर ड्रेनेज सिस्टिम चांगली होईल. वेस्टेज वॉटरवर प्रक्रिया करून ते पाणी टँकरद्वारे पुरविता येईल, याशिवाय अग्निशमनासाठी वापरणे शक्य होईल का? याबाबत वैज्ञानिक आणि पर्यावरणपूरक दृष्टीने अभ्यास होणार आहे. पावसाचे जे पाणी वाहून जाते ते अडविण्याची सुविधा या सिस्टिममध्ये राहणार आहे. डीपीआरच्या अवलोकनानंतर या नव्या प्रणालीचे कार्यान्वयन ठरणार आहे. ३० नाल्यांचे बांधकाम प्रस्तावितशहरातून वाहणाऱ्या ३० लहान-मोठ्या नाल्यांचे बांधकाम या सिस्टिममध्ये प्रस्तावित आहे. लोकवस्तीला लागून असलेल्या परिसरातील ३० नाल्यांचे बांधकाम करण्यात येणार आहे. भूमिगत गटार योजना शहरभर कार्यान्वित न झाल्याने वेस्टेज वॉटर आणि ड्रेनेजचा प्रश्न निर्माण झाला. या नव्या सिस्टिममध्ये अनुषंगिक सर्व बाबींचा समावेश होणार आहे. पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्याचा प्रयोगपावसाचे पाणी जमिनीत मुरविण्याचा प्रयोग स्टॉर्म वॉटर ड्रेनेज सिस्टिममध्ये अपेक्षित आहे. यामुळे भूजल पातळीत वाढ शक्य आहे का, याची चाचपणी करता येणे शक्य होईल. औद्योगिकरण आणि नागरिकरणाच्या विलक्षण रेट्याखाली शहरांमध्ये सांडपाणी व्यवस्थापनाचा भीषण प्रश्न आहे. मोठ्या लोकवस्तीच्या शहरांमध्ये सांडपाण्याचा निचरा योग्यरीतीने होण्याची पुरेशी व्यवस्था नाही. हीच परिस्थिती राहिली तर येत्या दशकात बहुतांश जलस्त्रोत नष्ट होतील. ती वेळीच रोखली गेली नाही तर अनर्थ अटळ आहे. स्टॉर्म वॉटर ड्रेनेज सिस्टिमध्ये वादळ किंवा अतिवृष्टीमुळे शहरातील नाल्यांमध्ये व इतर भागांत साचणाऱ्या पाण्याचा वेगाने निचरा होणे शक्य होणार आहे. युनिटी कन्सल्टन्सीकडे ‘डीपीआर’शहराच्या हद्दीत स्टॉर्म वॉटर ड्रेनेज सिस्टिम कार्यान्वित करण्यासाठी पुणे येथील युनिटी कंसल्टंसीकडे ‘डीपीआर’ बनविण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. याबाबत ९० टक्के काम झाले असून उर्वरित काम आटोपताच या पंधरवड्यात सदर कंपनी पालिकेसमोर ‘डीपीआर’चे पॉवर पॉर्इंट प्रेझेंटेशन करणार आहे.अमृत योजनेतून निधीआयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प आकारास येत आहे. या प्रकल्पासाठी सुमारे २५० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. महापालिका एवढा मोठा खर्च स्वबळावर करू शकणार नसल्याने अमृत योजनेतील निधी या प्रकल्पासाठी मागितला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. अमरावती महापालिकेचा याआधीच अमृत योजनेत समावेश झालेला आहे.
अंबानगरीत ‘स्टॉर्म वॉटर ड्रेनेज सिस्टिम’
By admin | Published: March 05, 2016 11:58 PM