अनंत बोबडे
येवदा : जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाच्या व १७ सदस्यसंख्येच्या येवदा ग्रामपंचायतमध्येे स्ट्रीट लाईट घोटाळा झाल्याचा आरोप सदस्याने केला आहे. सरपंचांच्या चौकशीची मागणी त्यांनी केली. त्यानुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
ग्रामपंचायत निधी संदर्भात कुठलेही नियोजन मासिक सभेमध्ये सर्व सदस्यांसोबत चर्चा करून त्यावर ठराव घेऊन करावे लागत असते. परंतु, सरपंच प्रतिभा राजेंद्र माकोडे व सचिव हे गेल्या पाच महिन्यांपासून मनमानी व हुकूमशाही पद्धतीने पंचायतीचे कारभार चालवीत असल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्य सुयोग टोबरे यांनी केला. तीन महिन्यांपूर्वी विश्वासात न घेता उपसरपंच व काही सदस्य परस्पर कारभार करीत असल्याचा आरोप सरपंच प्रतिभा माकोडे यांनी केला होता. आता ग्रामपंचायतीत पथदिवे खरेदीत मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप सुयोग टोबरे यांनी केला. तक्रारीनुसार, सरपंच व सचिव यांनी पथदिव्यांकरिता निविदा न मागवता पिंपळोद येथील एका दुकानातून २०० रुपये दराने १५ वॅट क्षमतेचे ७० एलईडी बल्ब (१४ हजार रुपये) व १२ टक्के जीएसटी (१६८० रुपये) असा एकूण १५ हजार ६८० रुपयांची खरेदी करण्यात आली. हे बल्ब त्यांनी स्वत:च्या घरी ठेवले होते. सुयोग टोबरे यांनी पिंपळोद येथील त्याच दुकानात जाऊन त्याच प्रकारच्या 15 w एलईडी बल्ब ची मागणी दुकानदाराला केली तेव्हा १०० रुपये प्रतिनग दराने त्यांना बल्ब मिळाले. जवळपास दुपटीने बल्ब खरेदी केल्याचे उघड झाल्याने टोबरे यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे लेखी निवेदन देऊन सरपंच व सचिव यांचेवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
------------------------
मी सरपंच झाल्यापासून उपसरपंच व काही सदस्य मनमानी कारभार करून गैरकामाच्या बिलांवर व धनादेशावर हस्तक्षर करण्याकरिता दबावतंत्राचा वापर करीत होते. आता विकासकामात स्वत: लक्ष देत असल्याने भ्रष्टाचाराला आळा बसला. त्यामुळे हताश होऊन असे आरोप केले जात आहेत.
- प्रतिभा माकोडे, सरपंच, येवदा
--------------
सरपंच प्रतिभा माकोडे यांनी खरेदी केलेले पथदिवे निकृष्ट दर्जाचे आहेत. पिंपळोद येथील त्याच दुकानातून अर्ध्या किमतीत ते खरेदी केले. त्याचे बिल सुद्धा माझेकडे आहे. ग्रामस्थांची ही फसवणूक आहे. यामुळे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.
- सुयोग टोबरे, ग्रामपंचायत सदस्य