संजय राठोड यांचे प्रतिपादन : भव्य सहकार मेळाव्याचे आयोजनअमरावती : 'विना सहकार नही उध्दार' या घोष वाक्यानुसार सहकार चळवळ मजबूत करून शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सर्वांनी विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे प्रतिपादन महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी रविवारी केले.तिवसा येथे आयोजित भव्य सहकार मेळाव्यात मार्गदर्शक करताना ते बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन उद्योग राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे यांचे हस्ते झाले. यावेळी विधानसभा माजी उपाध्यक्ष शरद तसरे, माजी आमदार संजय बंड, भाजप नेत्या निवेदिता चौधरी, बाजार समितीचे पदाधिकारी, सदस्य, तिवसा पंचायत समिती सदस्य, शेतकरी पॅनेलचे सदस्य उपस्थित होते.संजय राठोड म्हणाले, राज्यात विविध सहकारी कार्यरत संस्था आहे. सहकार विभागाव्दारे विविध सहकारी संस्थांच्या माध्यमातून कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करण्यात येते. सहकारी सस्थांनी जबाबदारी समजून जनतेला व शेतकऱ्यांना शासकीय योजनांची माहिती व लाभ करुन द्यावा. शेती पिकांबाबत व सिंचन सुविधेसंबंधी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करावी. बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या उत्पादित मालास चांगला भाव, माल ठेवण्यासाठी गोदाम, साठवणूक आदी बाबींची सुविधा उपलब्ध करुन द्यावी. विदर्भात कोरडवाहू जमीन आहे. पावसाचे प्रमाण चांगले असले तरी त्याप्रमाणात भरघोस उत्पादन होत नाही. या समस्येकडे जाणीवपूर्वक लक्ष देऊन अभ्यास करुन सोडविण्याचा प्रयत्न करावे, असे आवाहनही राज्यमंत्र्यांनी उपस्थितांना केले. पालकमंत्री प्रवीण पोटे म्हणाले की, विदर्भात शेती हा मुख्य व्यवसाय आहे. सर्व सहकारी संस्थांनी शेतकऱ्यांना सहकारचे महत्त्व पटवून देऊन सहकारी संस्थेच्या माध्यमातून लाभ होऊ शकतो यासंबंधी जनजागृती करावी. राज्य शासनाव्दारे राबविण्यात येणाऱ्या शासकीय योजनांची माहिती शेतकऱ्यांना करुन द्यावी. राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून राज्यात शासनाव्दारे जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून सुमारे २४३ टीएमसी पाणीसाठा निर्माण झाला आहे. यामुळे सुमारे १० हजार ६०० हेक्टर जमिनीवर सिंचन सुविधा निर्माण झाली आहे. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी राज्य शासनाव्दारे अन्न सुरक्षा योजना आणून याचा सुमारे दोन हजार शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला आहे. राजीव गांधी जीवनदायी योजनेचा लाभ शेतकऱ्यांना देण्यात आला आहे. सर्वसामान्य जनता व शेतकऱ्यांनी आपले जीवनमान उंचावण्यासाठी शासनाव्दारे पुरस्कृत करण्यात आलेल्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन पोटे यांनी केले. प्रास्ताविक साहेबराव लसणापुरे यांनी, संचालन शंतनू देशमुख यांनी केले. यावेळी संस्थांचे पदाधिकारी, शेतकरी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
शेतकरी कल्याणासाठी सहकार चळवळ मजबूत व्हावी
By admin | Published: September 01, 2015 12:02 AM