अमरावती : वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येस जबाबदार अधिकाऱ्यावर कठोर कारवाईची मागणी राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री तथा पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शुक्रवारी निवेदनाद्वारे केली.
मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत वन्यजीव विभागातील महिला वनरक्षक, वनपाल यांना शासकीय कर्तव्य बजावताना कामाच्या ठिकाणी येत असलेल्या समस्यांची त्रयस्थ यंत्रणेकडून चौकशी करण्याबाबत ना. ठाकूर यांनी यापूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले असून, जिल्हाधिकाऱ्यांनीही वन प्रशासनाला तसे सूचित केले होते.
त्याबाबत वन प्रशासनाने केलेल्या कारवाईचा अहवाल सादर करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत.
कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई आणि निवारण) अधिनियम २०१३ नुसार प्रत्येक शासकीय कार्यालयाने महिला तक्रार निवारण समिती गठित करण्याची सूचना वेळोवेळी देण्यात आली. मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील विविध कार्यालयांत एखादा अपवाद वगळता सूचनांची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे तेथील कार्यरत महिला वनरक्षक, वनपाल यांना कामाच्या ठिकाणी होत असलेल्या अधिकारीनिर्मित समस्यांची त्रयस्थ यंत्रणेकडून सखोल चौकशी करून त्यांच्या समस्यांचे कायमस्वरूपी निवारण करावे व अशी परिस्थिती निर्माण होण्यास कारणीभूत दोषी अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याबाबत निवेदन महाराष्ट्र वनरक्षक-वनपाल संघटनेने ना. ठाकूर यांना दिले होते. त्याची तत्काळ दखल घेऊन त्यांनी सविस्तर चौकशीबाबत पत्रही प्रशासनाला यापूर्वीच दिले आहेत.