अमरावती : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू असलेल्या निर्बंधांच्या कालावधीत १ जून रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत वाढ करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त अजून काही निर्बंध लावण्यात आले आहेत. ‘ब्रेक दि चेन’ अंतर्गत यासंदर्भातील शासन आदेश गुरुवारी जारी करण्यात आला असला तरी जिल्ह्यात काही नवीन बाबींचा समावेश व काहींमध्ये शिथिलता असणारा आदेश शुक्रवारी जाहीर करणार असल्याचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सांगितले.
कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी १५ मे पर्यंत कठोर संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आले होते. आता त्याला मुदतवाढ देण्यात आल्याने १ जून रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत कायम असतील. कोणत्याही वाहनातून राज्यामध्ये दाखल होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे आरटीपीसीआर निगेटिव्ह चाचणी अहवाल असणे अनिवार्य आहे. हा अहवाल राज्यात प्रवेश करण्याच्या जास्तीत जास्त ४८ तास अगोदर केलेल्या चाचणीचा असावा. मालवाहतूक करणाऱ्यांकरिता एका वाहनात फक्त दोन व्यक्ती (चालक आणि क्लिनर/हेल्पर) यांना प्रवास करण्याची मुभा असेल. जर हे मालवाहक महाराष्ट्रच्या बाहेरून येत असतील तर त्यातील दोघांना आरटीपीसीआर निगेटिव्ह चाचणी अहवाल द्यावा लागेल आणि हा अहवाल राज्यात दाखल होण्याच्या जास्तीत जास्त ४८ तासांपूर्वीचा असावा. हा अहवाल सात दिवसांकरिता वैध राहील, अशे शासनादेशात नमूद आहे.
बॉक्स
जिल्हाधिकाऱ्यांना विशेषाधिकार
जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख या नात्याने जिल्हाधिकाऱ्यांना विशेष अधिकार आहे. त्यामुळे जिल्हाकरिता काही बाबींमध्ये काहीअंशी शिथिलता व काही नव्या बाबींचा समावेश असणारे आदेश शुक्रवारी लागू होणार आहेत. यात शेतीविषयक कामे, रेशन व भाजीपाला विक्री संदर्भात काही प्रमाणात सूट राहणार असल्याची माहिती आहे.