अमरावती : शहरातील प्रत्येक मुख्य चौकात नाकेबंदी करण्यात आली असून, विनाकारण बाहेर फिरणाऱ्या प्रत्येक वाहनचालकांची कसून चौकशी करून त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. शहरात लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी दिले आहे.
गुरुवारी रात्री पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी रस्त्यावर उतरून अनेक वाहनचालकांची झडती घेतली. तसेच विनाकारण फिरताना आढळलेल्या नागरिकांवर तातडीने गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले. शहरातील पंचवटी चौकात रात्री ८ वाजताच्या सुमारास अर्धा तास थांबवून नागरिकांची तपासणी त्यांनी केली. विनाकारण फिरणे, मास्क न घालणे यासंबंधी नागरिकांची कसून चौकशी करण्यात आली. पोलीस आयुक्तांनी शहरातील अनेक नाकेबंदी पॉईंटला भेटी देऊन संबंधित ठाणेदारांना कठोर कारवाईचे निर्देश दिले. त्यांनी शहरात आस्थापना, बार सुरू आहेत का, याचीसुद्धा पाहणी केली. या कारवाईमुळे विनाकारण फिरणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. शहरात एक हजारांपेक्षा जास्त पोलिसांचा बंदोबस्त असून, ठाणेदार सतत गस्त घालत आहेत.