अमरावती : नोंदणी व मुद्रांक विभाग अराजपत्रित अधिकारी कर्मचारी यांच्या विविध मागण्या प्रलंबित असून शासनाने कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे राज्यातील सर्व दुय्यम निबंधक श्रेणी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे.
जिल्ह्यातील १६ दुय्यम निबंधक सेनेचे तालुकास्तरीय कार्यालय असून त्यामध्ये १३ कार्यालयाचे कामकाज बंद आहे. नोंदणी आणि मुद्रांक विभाग बंद असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या बेमुदत संपामुळे मुद्रांक विभागाला आर्थिक फटका बसला. संपात सब रजिस्टार, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक सहभागी झाले आहेत. जिल्ह्यातील नोंदणी आणि मुद्रांक विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले आहे. याचा परिणाम तालुकास्तरावर बहुतेक ठिकाणी दस्तांची नोंदणी होऊ शकली नाही. यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडाला.
कर्मचाऱ्यांना ५० लाखांचे जीवन विमा सुरक्षा कवच मिळावे. विभागातील कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना भरपाई मिळावी तसेच कुटुंबातील अनुकंपा तत्त्वावर घेण्यात तातडीने रखडलेल्या पदोन्नत्या कर्मचाऱ्यांना देण्यात यावे. तुकडेबंदी आणि रेरा कायद्यान्वये झालेल्या कारवाई त्वरित मागे घ्यावी. विभागातील वरिष्ठ व कनिष्ठ लिपिक यांच्या सेवाज्येष्ठता यादी २०१८ पासून प्रलंबित आहेत. त्यात अंतिम करून प्रसिद्ध कराव्या. सहदुय्यम निबंधक वर्ग २ व दुय्यम निबंधक श्रेणी-१ संवर्गाची एकत्रीकरण करावे, अशा मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे.
आंदोलनात सुनील वाडेवाले, मनोज ढोले, एम.के. राठोड, मंगेश इंगळे, मनीष पलीकोटवार, रवींद्र नागेकर, प्रकाश गिरी, राजू सावन, हर्षल राऊत, सागर गुडदे, सूरज चक्रे, श्रीकांत थोपटे, मधुकर लाखोडे, जयंत डोंगरे, सुधीर मालोकार, गणेश भागवत, जितेंद्र कांबळे, शैलेश माहोरे, पुंडलिक राठोड, सोमनाथ झडे, सुरेश चोरमारे, हनुमान बोरकर, ज्योती शेगोकार, प्रिया चक्रे, अनिता सदरे, रूपेश बनसोड, अरविंद बनसोड, रमेश पवार, बिपिन पडोळे आदींचा सहभाग आहे.