अमरावती : दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी अप्पर मुख्य वनसंरक्षक एम. एस. रेड्डी यांच्या सहभागासंदर्भात शासनाने तपासासाठी नियुक्त केलेल्या आयपीएस अधिकारी आणि अप्पर पोलीस महासंचालक डॉ. प्रज्ञा सरवदे यांची भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी बुधवारी भेट घेऊन रेड्डी यांच्याविरोधात असलेले सबळ पुरावे त्यांच्यासमोर मांडले.
दीपाली चव्हाण यांनी २५ मार्च रोजी आत्महत्येपूर्वी एक पत्र रेड्डी यांना लिहिले. सोबतच आई व पतीला प्रत्येकी एक पत्र लिहिले. म्हणजेच दीपालीच्या तीन सुसाईड नोट आहेत. रेड्डी यांना लिहिलेल्या पत्रात त्यांना वारंवार तक्रारी केल्या. रेड्डी यांचाच शिवकुमारला वरदहस्त आहे. रेड्डींना रेकॉर्डिंग ऐकविले, असे स्पष्ट उल्लेख आहेत. दीपालीने आपल्या पतीला लिहिलेल्या पत्रातदेखील रेड्डी यांना वारंवार सांगूनही त्रास कमी न झाल्याचे स्पष्ट नमूद केले आहे. आईला लिहिलेल्या पत्रात, रेड्डी यांना सर्व सांगूनही उपयोग झाला नसल्याचे व टोकाचा त्रास होत असल्याचे दीपालीने नमूद केले आहे. तीन सुसाईड नोटमध्ये असलेल्या दीपालीच्या तीव्र भावना पाहता रेड्डी यात निश्चितच कायद्यानेच सहआरोपी करायला पाहिजे. मात्र, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रेड्डींना पाठीशी घातल्यामुळे त्यांच्यावर अद्यापि ठोस कारवाई करण्यात आली नसल्याचे शिवराय कुळकर्णी यांनी तपास अधिकाऱ्यांना सांगितले. डॉ. प्रज्ञा सरवदे यांनी काळजीपूर्वक सर्व बाजू ऐकून घेतल्याबद्दल शिवराय कुळकर्णी यांनी त्यांचे आभार मानले आहेत. ही चौकशी समिती दीपालीला न्याय देईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.
---------------
रेड्डी यांनी नियमांची केली पायमल्ली
एम. एस. रेड्डी यांच्या समर्थनार्थ एक वन कर्मचाऱ्यांची चमू निवेदन घेऊन लोकप्रतिनिधी आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या दारोदार फिरली. रेड्डी यांच्या दबावात येऊन, हतबल होऊन आम्हांला निवेदन घेऊन फिरावे लागत असल्याचे यातील लोक दबक्या आवाजात सांगताहेत. शिवाय, हे कृत्यही शासकीय नियमांची पायमल्ली करणारे आहे. महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम १९७९ कलम २९ व ३० चा भंग आहे. ग्रेव्ह मिसकंडक्ट प्रकार आहे. कर्मचाऱ्यांची पराकोटीची संघटित गैरवर्तणूक आहे आणि यासाठीदेखील त्यांच्यावर अधिकाराचा दुरुपयोग करून दबाव टाकणारे रेड्डीच कारणीभूत असल्याचा आरोप शिवराय कुळकर्णी यांनी केला.
------------------------
रेड्डींनी हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले
दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी एम. एस. रेड्डी यांना अचलपूर न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारताना न्या. एस. के. मुनगीलवार यांनी रेड्डी यांच्या कृतीवर गंभीर ताशेरे मारले आहेत. आरोपी विनोद शिवकुमार याच्या सर्व तक्रारी रेड्डी यांच्या कानांवर होत्या. मात्र, रेड्डी यांनी शिवकुमार यांच्यावर कुठलीच कारवाई केली नाही व त्याच्या वर्तणुकीला आळादेखील घातला नाही. त्यामुळे या प्रकरणी रेड्डी सरकारी दस्तऐवज फेरफार करू शकतात किंवा पुरावे प्रभावित करू शकतात. तपासात खोडा घालण्यासही रेड्डी कारणीभूत ठरू शकतात. न्यायालयीन सुनावणीत ताशेरे मारले असतानाही पोलिसांचा व सरकारी उच्चपदस्थांचा रेड्डींना वाचविण्याचा अट्टहास का, असा प्रश्नही शिवराय कुळकर्णी यांनी यावेळी उपस्थित केला.