अमरावती: केंद्राच्या सुधारित नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनार्थ सोमवारी धारणी शहरातून रॅली काढण्यात आली. यासाठी सर्वपक्षीय, सर्वधर्मीय तिरंग्याखाली एकवटले होते. संपूर्ण शहरातून रॅली काढल्यानंतर उपविभागीय अधिकाºयांना निवेदन सोपविण्यात आले. या रॅलीचे उपविभागीय कार्यालयासमोर सभेत रूपांतर झाले. देशहितकारक कायद्याला काहींनी केवळ राजकारण म्हणून विरोध चालविल्याची भावना यावेळी मोर्चेकऱ्यांनी व्यक्त केली.
देशात आता राष्ट्रहित सर्वोपरी मानणाºयांचे शासन आहे. त्यामुळे देश तोडण्याची भाषा करणाऱ्यांनी सावध व्हावे, असे आवाहन लवादा येथील संपूर्ण बांबू केंद्राचे संचालक सुनील देशपांडे यांनी केले. सभेला माजी आमदार प्रभुदास भिलावेकर, माजी महसूल उपायुक्त रमेश मावस्कर, रतनलाल परिहार, आप्पा पाटील, सागर खेडकर, हिरालाल मावस्कर यांनी मार्गदर्शन केले. नागरिक संशोधन विधेयक हे आता कायद्यात परिवर्तित झाल्याने विरोध योग्य नसल्याचे मत वक्त्यांनी मांडले. यावेळी डॉ. रवि पटेल, सुनील चौथमल, संजय भागवत, गोपाल राठोड, ललित जोशी, राजू वाघमारे, नवल प्रजापती, अशोक टेकाम, मोहनकुमार गंगराडे उपस्थित होते.
रॅली व सभेला तालुक्यातील गावागावांतून हजारोंच्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती दर्शविली. ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ असे नारे रॅलीत गुंजले. दोनशे फूट लांबीचा तिरंगा झेंडा विशेष आकर्षण ठरला. सभेचे प्रास्ताविक रवि पटेल, संचालन श्यामकुमार गंगराडे आणि आभार प्रदर्शन रवि नवलाखे यांनी केले. सीएए समर्थनार्थ निघालेल्या रॅलीत सहभागी होण्यासाठी व्यापाºयांनी आपआपली प्रतिष्ठाने सकाळपासून बंद ठेवले होती.
आमदाराचे समर्थन
स्थानिक आमदार राजकुमार पटेल यांनी कृषिउत्पन्न बाजार समिती येथे येऊन सीएए समर्थनार्थ निघालेल्या रॅलीला समर्थन दिले. कुठल्याही धर्माची भावना न दुखावण्याचे आवाहन त्यांनी केले. राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाच्या उमेदवारीवर पटेल निवडून आले आहेत, हे विशेष.