अमरावती : नवसारी रस्त्यावरील देशी दारुचे दुकान हटविण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चेदरम्यान आंदोलकांसोबत आलेले भंते अचानक जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्या वाहनावर ठिय्या देऊन बसल्याने गोंधळ उडाला. मंगळवारी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेऊन धरणे देण्यात आले. देशी दारुचे दुकान इतरत्र स्थलांतरीत करावे, यासाठी २० जानेवारी रोजी या भागातील महिला मंडळ व नागरिकांनी निवेदन सादर केले होते. आंदोलकांच्या भावना अनावरया निवेदनाची दखल घेण्यात आली नसल्याने पुन्हा याच मागणीसाठी मंगळवारी या परिसरातील शेकडो महिला व पुरुषांनी दारु दुकानाच्या स्थलांतरणासाठी जिल्हाकचेरीवर मोर्चा काढून धरणे दिले. दरम्यान आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्याशी त्यांच्या दालनात चर्चा केली. ही चर्चा आटोपून बाहेर आलेल्या आंदोलनकर्त्यांनी जिल्हाकचेरीच्या परिसरात तीव्र घोषणाबाजी करीत दारु दुकान बंद करण्याची मागणी केली. अशातच जिल्हाधिकारी दुपारी घरी जाण्यास निघाले असता आंदोलनकर्त्यांनी त्यांचे वाहन रोखले. आंदोलनकर्त्यांच्या तीव्र भावना लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी वाहनाच्या बाहेर येऊन चर्चाही केली. मात्र आंदोलनकर्त्यांशी बोलणे कठीण वाटत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा दालन गाठले. जिल्हाधिकारी भवना ऐकून घेत नाहीत, असा समज झालेल्या आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्याच्या गाडीला गराडा घातला. भंते अचानक वाहनावर चढले नि ठिय्या दिला. यावेळी प्रचंड घोषणाबाजी झाली. या घटनेमुळे काहीवेळ तणाव निर्माण झाला होता.अचानक घडलेल्या या प्रकारामुळे पोलीस आणि जिल्हा प्रशासन अवाक् झाले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना परिसरातून बाहेर काढले. आंदोलनात अमोल इंगळे, उमेश इंगळे, सविता भटकर, संजय गायकवाड, दीपक सरदार, मनोज थोरात, देवीदास मोरे, आर.एम. तायडे, सविता गायकवाड, कविता तानोडे, शोभा वानखडे, पंचफुला गायकवाड, जिजाबाई मनोहरे, पुष्पा गायकवाड, सविता तायडे आदींचा समावेश होता.
जिल्हाधिकाऱ्यांच्या वाहनावरच ठिय्या!
By admin | Published: February 03, 2015 10:47 PM