अमरावती :वनविभागात हल्ली बदल्यांचा मोसम सुरू झाला असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये बदल्यांच्या अधिकारासाठी संघर्ष उफाळून आला आहे. बदल्यांचे सर्वाधिकार आपल्याच मिळावे, यासाठी चक्क राज्याच्या वनबलप्रमुखांनी तशी खेळी चालविली असली तरी स्वत: वनमंत्र्यांनी असे अधिकार देता येणार नाही, अशी स्पष्ट भूमिका घेतली आहे. विशेषत: आरएफओंच्या बदल्यांकडे वरिष्ठ वनाधिकाऱ्यांच्या नजरा खिळल्या आहेत.
राज्यस्तरावर एका वनवृत्तातून दुसऱ्या वनवृत्तात आरएफओंच्या बदलींबाबतचे प्रस्ताव अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक तयार करतात. पुढे राज्य शासनाकडे अंतिम मंजुरीसाठी ते पाठवावे लागतात. परंतु, आरएफओंच्या बदल्यांचे अधिकार वनबलप्रमुखांनी आपल्याकडे ठेवण्याचा डाव वनमंत्र्यालयातून उधळण्यात आला आहे. वनबलप्रमुखांचे स्वीय सहायकांनी हा प्रताप केल्याची माहिती पुढे आली आहे. मात्र, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बदल्यांसंदर्भात घेतलेल्या कणखर भूमिकेमुळे आता बदलीपात्र आरएफओंना न्याय मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
वनबल भवनात दलाल सक्रिय
आरएफओंच्या चार टप्प्यांत बदल्या करण्याची प्रथा वनविभागात आहे. राज्यस्तरावर दोनदा व सर्कलस्तरावर दोनदा अशा बदल्या केल्या जातात. मात्र, सर्कलस्तरावर होणाऱ्या बदल्या लागेबांधे आणि मोठी आर्थिक उलाढाल करून केल्या जातात. हे वास्तव आहे. या हंगामात होणाऱ्या बदल्यांकरिता दलाल सक्रिय झालेले आहेत.
सहायक वनसंरक्षकांना निकष का नाही?
सहायक वनसंरक्षक प्रादेशिक वनविभागात कार्यरत असताना त्यांना कॅम्पा, वन्यजीव, रोहयो, संरक्षण व अतिक्रमण निर्मूलन अशा उपशाखेनुसार बदली दिली जाते. वनविभागात तीन वर्षांनंतर प्रादेशिक, वन्यजीव, वनीकरण, कार्य आयोजनाप्रमाणे बदली देण्यासंदर्भात आदेश आहे. मात्र, हे निकष सहायक वनसंरक्षक यांना लागू होताना दिसून येत नाही. उपशाखा असल्यामुळे मंत्रालयातून सहायक वनसंरक्षकांच्या बदल्या प्रादेशिक ते प्रादेशिक अशा होताना दिसून येते. कारण बदली झाल्यानंतर ब्रॅकेटमध्ये कॅम्पा, वन्यजीव, रोहयो, संरक्षण अशा शब्द उच्चार होत असल्याने या शब्दांचा फायदा सहायक वनसंरक्षकांना होत आहे.
आरएफओ वा अन्य कर्मचाऱ्यांच्या बदल्यांबाबत कोणतेही नवीन धोरण ठरविले नाही. जुन्याच पद्धतीने बदल्यांची प्रक्रिया राबविली जाईल. वनबलप्रमुखांकडे जी काही जबाबदारी निश्चित केली,ती त्यांना पार पाडावी लागेल. बदलीप्रक्रियेत कुणाचाही अनावश्यक हस्तक्षेप असणार नाही.
- सुधीर मुनगंटीवार, वने, सांस्कृतिक कार्यमंत्री