कोरोना इफेक्ट; केवळ अत्यावश्यक सेवेसाठी धावत आहेत बसेस
अमरावती : कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता राज्य परिवहन महामंडळाने शनिवारपासून जिल्हाभरातील अत्यावश्यक प्रवासी वाहतूक वगळता अन्य प्रवाशांची वाहतूक सेवा बंद केली आहे. यामुळे प्रवाशांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली आहे.
गत काही दिवसापासून राज्यभरात कोरोना संसर्गाची दुसरी लाट वाढत आहे. यात कोरोना बाधित रुग्णांची संख्याही शहरासोबतच ग्रामीण भागात वाढल्यामुळे शासनाने अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्व प्रकारची वाहतूक सेवा ब्रेक द चैन मध्ये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला अनुसरून शनिवारी एसटी बसेसची सेवा सर्व सामान्य प्रवाशांची वाहतुक सेवा बंद केली. परिणामी परिवहन महामंडळाने अत्यावश्यक सेवेतील प्रवाशी वाहतुक सुरू ठेवून अन्य प्रवाशांची वाहतूक बंद केल्यामुळे येथील मध्यवर्ती बसस्थानकांवर आलेल्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.
कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून वरिष्ठ स्तरावरून प्राप्त निर्देशानुसार जिल्ह्यात अमरावतीसह अन्य आठ एसटी अगारातूनही केवळ अत्यावश्यक व निकडीच्या वेळीच एसटी बसेस सोडण्यात येत असल्याचे स्थानिक एस.टी. महामंडळाचे अधिकाऱ्यांनी सांगितले. जिल्हांतर्गत तसेच जिल्हाबाहेर सोडण्यात येणाऱ्या जवळपास दीड हजारांवर बसफेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत.
बॉक्स
अचानक प्रवेशव्दार बंद
मध्यवर्ती बसस्थानकांवर शनिवार सकाळपासूनच प्रवाशांची वर्दळ सुरू होती. मात्र, अत्यावश्यक सेवेसाठीच बसेस सोडल्या जात असल्याने अन्य प्रवाशांना बसस्थानकाबाहेर काढण्यात आले. बसेस नसल्यामुळे प्रवाशांची मात्र मुख्यप्रवेशव्दारा समारे चांगलीच गर्दी जमली होती.
बॉक्स
१०० वाहक-चालक मुंबईकडे रवाना
राज्य परिवहन महामंडळाचे स्थानिक प्रत्येकी ५० चालक आणि वाहक तसेच ५ पर्यवेक्षक आदी एसटी कर्मचाऱ्यांचा जथ्या शनिवार १७ एप्रिल रोजी मुंबई येथील बेस्टच्या बसेस चालविण्यासाठी येथील मध्यवर्ती बसस्थानकांहून रवाना झाले आहेत. ते पुढील १५ दिवस मुंबईच्या बेस्टच्या बसेस चालविणार आहेत.
कोट
कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता एसटी महामंडळाने केवळ अत्यावश्यक सेवेसाठीच बसेस सुरू ठेवल्या आहेत. अन्य प्रवाशी वाहतूक सेवा जिल्ह्यातील आठही आगारांतून बंद करण्यात आली आहे. ३० एप्रिलपर्यंत ही सेवा बंद राहणार आहे.
- श्रीकांत गभणे,
विभाग नियंत्रक