अंमलबजावणी हवी : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा आदेशअमरावती : नांदगाव पेठ येथील रतन इंडिया औष्णीक वीज प्रकल्पाच्या राखेपासून आता विटभट्टी चालकांना वीट तयार करावी लागणार आहे. यापूर्वी वीट तयार करण्यासाठी राख आणि लाल मातीचा ‘फिफ्ट-फिफ्टी’ वापर करण्यात येत होता. आता मात्र १०० टक्के राखेचाच वापर वीज प्रकल्पाच्या ३०० किलोमीटर परिघातील वीट कारखान्यांना करावा लागणार आहे, याविषयीचा निर्णय महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाने घेतला आहे. या निर्णयामुळे वीट तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या गौण खनिज चोरीला आळा बसणार आहे. राज्यात विविध ७ ठिकाणी औष्णीक वीज प्रकल्प कार्यान्वित आहेत. जिल्ह्यात नांदगाव पेठ येथे देखील औष्णीक वीज प्रकल्प आहे. या परिसरात अनेक वीट कारखाने आहेत. वीट तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लाल मातीचे उत्खनन होत असल्याने त्याचे अनिष्ट परिणाम पर्यावरणावर होत आहेत. आता मात्र वीट तयार करण्यासाठी प्रकल्पामधून निघणाऱ्या राखेचाच वापर करावा लागणार आहे. या राखेपासून दर्जेदार वीट तयार होते व राखेची योग्यरित्या विल्हेवाट लावली जाते. त्यामुळे वीट तयार करण्यासाठी विद्युत प्रकल्पातून निघणाऱ्या राखेचा १०० टक्के वापर करावा, असे प्रदूषण महामंडळाचे आदेश आहेत. यापूर्वी १०० कि.मी. परिघातील वीट कारखान्यांना हा आदेश लागू होता. आता नव्या आदेशानुसार ३०० किलोमीटर परिघातील वीट कारखान्यांना हा आदेश लागू करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
राखेच्या विटांसाठी वीटभट्टी चालकांना सक्ती
By admin | Published: June 09, 2016 12:29 AM