धारणी : शासनाने जारी केलेल्या ७ जुलै रोजीच्या निर्णयानुसार आणि जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी १२ जुलै रोजी जारी केलेल्या सूचनेनुसार धारणी तालुक्यातील बहुतांश शाळा १५ जुलै रोजी नियम व अटीच्या अनुषंगाने सुरू झालेल्या नाहीत. शिक्षकांना विद्यार्थ्यांची प्रतीक्षा असल्याचे चित्र शाळांमध्ये होते.
शाळांमध्ये शिक्षकांची उपस्थिती शंभर टक्के असताना त्यांना विद्यार्थ्यांची प्रतीक्षा होती, असे चित्र गुरुवारी पाहावयास मिळाले. नियम व अटी नुसार ज्या गावात एक महिन्यापर्यंत एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले नाही, अशा गावात सरपंचांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करून शाळा सुरू करायची की नाही, याबाबत निर्णय घेणे बंधनकारक होते. धारणी येथील जिल्हा परिषद हायस्कूल आणि कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय येथे भेट दिली असता, धारणी येथे एक रुग्ण दाखल असल्यामुळे शाळा सुरू करण्यात आलेली नाही. जवळपास हीच परिस्थिती ग्रामीण स्तरावर पाहावयास मिळाली. धारणी तालुक्यात जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा ६५, जिल्हा परिषद हायस्कूल तीन आणि खासगी व अनुदानित आश्रमशाळा ३६ आहेत.