अमरावती : विदर्भातील अमरावती विभागात अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नांची सोडवणूक विद्यार्थी विकासातून होऊ शकते. यासाठी विद्यार्थी विकास हाच आपला केंद्रबिंदू राहणार असल्याचे प्रतिपादन संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे नवे कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांनी व्यक्त केले.
नवे कुलगुरू डॉ. मालखेडे यांचा शुक्रवारी काँग्रेसनगर मार्गावरील सर्वोदय कॉलनीत आयोजित सत्काराप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर त्यांचे वडील नामदेवराव, आई वेणूताई मालखेडे, पत्नी चित्रा व तीन बहिणी आदींची उपस्थिती होती. पुढे बोलताना कुलगुरू म्हणाले की, विद्यार्थ्यांवर लक्ष केंद्रित करून आपण काम करणार आहोत. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविणे नितांत गरजेचे आहे. त्याचा आत्मविश्वास वाढल्यास तो तुमचं बोट सोडणार आहे. यातून त्याला नवा उद्योग, नोकरी व व्यवसाय गवसणार आहे. विद्यापीठातून शिक्षण घेतल्यानंतर विद्यार्थ्यांनी बेरोजगार राहू नये, तो रोजगारक्षम असला पाहिजे. येथून बाहेर पडताच त्याला नोकरी व उद्योग मिळायला हवा. यासाठी त्याला सक्षम केले पाहिजे. ही जबाबदारी पार पाडण्याचा आपण प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
तत्पूर्वी सत्कार समितीच्या वतीने नवनियुक्त कुलगुरूंसह त्यांच्या आई-वडिलांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
संचालन डॉ. संजय खडसे यांनी केले. आभार दिनेश राजूतकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ईश स्तवन प्रा. अनिता खडसे यांनी केले. कार्यक्रमाला काँग्रेसचे विरोधी पक्षनेते बबलू शेखावत, संजय बाळापुरे, प्राचार्य डॉ. संजय खडसे, प्रा.डॉ. दिनेश रोजतकर, चंद्रशेखर खंडारे, नरेंद्र गणोरकर, डॉ. विजय तायडे, प्रकाश शेलापूरकर, कृष्णा मोहोकार, मधुकर बुंदेले, संजय सावरकर, विजय चापके, सतीश धुमाळे आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.